मुख्यमंत्री-अमित शाह भेटीनंतरही सत्ताकोंडी कायम, भाजप वेट अँड वॉचच्या भूमिकेत
शिवसेना-भाजपमधील चर्चा सध्या पूर्णपणे बंद आहे. चर्चेची दारं आम्ही नव्हे तर त्यांनी बंद केली असा भाजपचा आरोप आहे. तर मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याने चर्चा थांबली, असं शिवसेनेचं म्हणण आहे.
नवी दिल्ली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत अमित शाहांची भेट घेतल्यानंतर महाराष्ट्रातली सत्ताकोंडी फुटेल, असं वाटलं होतं. मात्र असं काही घडताना दिसत नाहीय. कारण शिवसेनेच्या दबावाला बळी न पाडता भाजपनेही तूर्तास वेट अँड वॉचची भूमिका घ्यायचं ठरवलं आहे. महाराष्ट्रातला सत्तापेच इतक्यात संपणार नाहीय. शिवसेना कितीही डरकाळ्या फोडत असली तरी भाजपही लगेच माघार घ्यायची शक्यता नाही. आज अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांचा हाच सूर दिसतोय.
आज दिल्लीत जवळपास चाळीस मिनिटे अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत ना राज्यातून कुणी आलं होतं, ना दिल्लीतलं कुणी यावेळी उपस्थित होतं. अगदी दोघांमध्येच वन टू वन ही चर्चा झाली. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या सोबत जाण्याच्या कितीही वल्गना करत असली तरी तसं होणार नाही, असा ठाम विश्वास भाजप श्रेष्ठींना आहे. त्यामुळेच शिवसेनेच्या बार्गेनिंगमधली हवा काढण्यासाठी अजून काही दिवस थांबायची त्यांची तयारी आहे.
VIDEO | "नवं सरकार लवकरच येणार, कोण काय बोलतं यावर भाजप बोलणार नाही"- देवेंद्र फडणवीस
शिवसेना-भाजपमधील चर्चा सध्या पूर्णपणे बंद आहे. चर्चेची दारं आम्ही नव्हे तर त्यांनी बंद केली असा भाजपचा आरोप आहे. शिवसेना अनुकूलता दाखवत नाही, तोपर्यंत चर्चा होणार नाही अशी भूमिका भाजपनं घेतलीय. अडीच वर्षे मुख्यमंत्री पदाचा शब्द बिलकुलही शिवसेनेला दिला नव्हता, याचा पुनरुच्चार भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी केलाय. पद आणि जबाबदाऱ्या यात मुख्यमंत्रिपद येत नाही हे देखील त्यांचं म्हणणं आहे.
मुख्यमंत्रीपद, गृहमंत्रीपद भाजप बिलकुल सोडायला तयार नाही. चार महत्त्वाच्या मंत्रिपदांपैकी महसूल आणि 16 खाती शिवसेनेला अशी भाजपची सध्याची तयारी आहे. शिवसेना-भाजपमधील चर्चा पूर्णपणे बंद आहे आणि ही चर्चा कुणी बंद केली यावरुन एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याने चर्चा थांबली. चर्चा थांबण्यास मुख्यमंत्रीच कारणीभूत आहेत. त्यामुळे चर्चा सुरु करायची असेल तर लोकसभेवेळी जे ठरलं होतं ते त्यांनी स्पष्ट करावं, मगच चर्चा सुरु होणार असं शिवसेनेचं म्हणणं आहे. थोडक्यात शिवसेना सत्तास्थापनेचा दावा करत ज्या हालचाली करतेय, त्या भाजप अजिबात गांभीर्यानं घेत नाहीय. त्यामुळेच शिवसेनेच्या बार्गेनिंगमधली हवा काढण्यासाठी अजून काही थांबण्याची भाजपची तयारी आहे.
VIDEO | अवकाळी पाऊस नुकसानग्रस्तांसाठी गृहमंत्र्यांकडून मदतीचं आश्वासन : मुख्यमंत्री