देशभरात कोरोनाची दुसरी लाट असेल मात्र दिल्लीत चौथी लाट : अरविंद केजरीवाल
कोरोनाची ही लाट मागील लाटेपेक्षा कमी धोकादायक आहे. कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे. टेस्टिंग, ट्रेसिंग आणि आयसोलेशन करण्याचे काम अतिशय वेगाने केले जात आहे, असं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं.
नवी दिल्ली : कोरोनाचं वाढतं संकट लक्षात घेत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काल आढावा बैठक घेतली. देशासाठी कोरोनाची ही दुसरी लाट असू शकते पण दिल्लीसाठी ही चौथी लाट आहे, असं मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं. दिल्लीत काल 3594 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती. 16 मार्च रोजी जवळपास 425 कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते.
दिल्लीत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहेत. ही चिंतेची बाब असून सरकारचं यावर लक्ष आहे. आम्ही आवश्यक ती पावले उचलत आहोत. लॉकडाऊन करण्याचा सध्यातरी विचार नाही. मात्र गरज भासल्यास चर्चेतून निर्णय घेण्यात येईल, असं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं.
Pune Lockdown : पुणेकरांनो कामाशिवाय घराबाहेर पडू नका! पुण्यात आजपासून सात दिवस मिनी लॉकडाऊन
अरविंद केजरीवाल म्हणाले की, कोरोनाचा प्रसार वेगाने होतो आहे. मात्र कोरोनाची ही लाट मागील लाटेपेक्षा कमी धोकादायक आहे. कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे. टेस्टिंग, ट्रेसिंग आणि आयसोलेशन करण्याचे काम अतिशय वेगाने केले जात आहे. सरकारकडून सर्व प्रयत्न केले जात आहेत, मात्र सामान्य लोकांचा सहभाग देखील महत्वाचा आहे. सर्वांनी मास्क घालून सामाजिक अंतर राखले पाहिजे, असं आवाहनही अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं.
राज्यात कोरोना परिस्थिती गंभीर! काल तब्बल 47 हजार 827 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ
बैठकीत केजरीवाल यांनी सांगितलं की, रुग्णालयांमध्ये रुग्णवाहिकांची व्यवस्था, आयसीयूची व्यवस्था, बेड्सची व्यवस्था याबाबत संपूर्ण नियोजन केले आहे. आतापर्यंत कोरोनाची स्थिती दिल्लीकरांनी योग्यरित्या हाताळली आहे. आता सरकार रुग्णालय व्यवस्थापन आणि लसीकरणावर लक्ष केंद्रित करत आहे.
दिल्लीत गुरुवारी 2790 लोकांना कोरोनाची लागण झाली होती आणि 9 रुग्णांचा मृत्यू झाला. त्याआधी बुधवारी 1819 लोकांना कोरोनाची लागण झाली आणि 11 रुग्णांचा मृत्यू झाला होता.