Maharashtra Corona Cases: राज्यात कोरोना परिस्थिती गंभीर! आज तब्बल 47 हजार 827 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ
राज्यात कोरोना परिस्थिती गंभीर होत चालली आहे. आज तब्बल 47 हजार 827 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली आहे.
मुंबई : राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आज तर कोरोना रुग्णसंख्या 50 हजारांच्या जवळपास पोहचली आहे. राज्यात आज तब्बल 47 हजार 827 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली. दरम्यान, राज्यात परिस्थिती आणखी बिघडली तर संपूर्ण लॉकडाऊन करण्यात येईल, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने होणारी वाढ पहाता काही दिवसांनी राज्यातील आरोग्य व्यवस्थेवर ताण येईल, त्यामुळे इच्छा नसताना निर्णय घ्यावा लागणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.
आज नवीन 24 हजार 126 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 2457494 रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 389832 सक्रीय रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 84.62% झाले आहे.
तर लॉकडाऊन अटळ आहे : मुख्यमंत्री
आपण मधल्या काळात गाफील झालो. आता कोरोनाशी लढताना आपण परिस्थितीत पाय घट्ट रोवून उभे राहुया. विरोधकांना विनंती करतो, की जनतेच्या आरोग्याशी खेळू नका. लॉकडाऊन जाहीर करत नाही, पण मी इशारा देत आहे. दृश्य स्वरुपातीव परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय लवकरच घेणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. महाराष्ट्र राज्य सरकार हे खंबीर आहे. आरोग्य सुविधांची कमतरता जाणवू देणार नाही. सर्वांच्या सहकार्याचीच मी अपेक्षा करतो. सणांवरही निर्बंध आणावे लागतील. नागरिकांकडून सहकार्याची अपेक्षा करत कोरोनाविरोधातील लढाई लढण्यासाठी सिद्ध व्हा, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी देत राज्यात कठोर निर्बंध लागणार असा इशारा दिला आहे.
पुणे जिल्ह्यात उद्यापासून सात दिवस संचारबंदी
महाराष्ट्रात कोरोनाचा कहर वाढत असताना जनतेत लॉकडाऊनची धास्ती कायम आहे. त्यात पुणे, मुंबईत कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर पुण्यात पुन्हा निर्बंध कडक करण्यात आले आहे. आज पुण्यात पालकमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. यानंतर पुण्यात काही निर्बंध घालण्यात आले आहेत. सगळी हॉटेल्स, बार, रेस्टॉरंट पुढील सात दिवसांसाठी बंद रहतील. मात्र होम डिलीव्हरी सुरू राहील. मॉल आणि थिएटर्स देखील सात दिवसांसाठी बंद राहतील.
सोबतच पुण्याची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेली PMPMLची बससेवा पुढील सात दिवसांसाठी बंद असतील. मात्र, कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना ने आण करण्यासाठी खाजगी वाहनांचा उपयोग करु शकतील. संध्याकाळी सहा ते पहाटे सहा वाजेपर्यंत पुणे जिल्ह्यात उद्यापासून सात दिवस संचारबंदी घोषित करण्यात आली आहे. हे सगळे निर्बंध उद्या संध्याकाळी सहा वाजल्यापासून लागू होतील.