(Source: ECI/ABP News/ABP Majha)
India-China Border | भारत आणि चीनचं एक पाऊल मागे, Pangong Tso Lake वरुन दोन्ही सैन्य मागे हटण्यास सुरुवात
भारत-चीन सीमेवरुन मोठी बातमी आहे. लडाख सीमेवरील पँगाँग त्सो लेकवरुन सैन्य मागे घेण्यावर भारत आणि चीनची सहमती झाली आहे.
लडाख : भारत आणि चीन सैन्याच्या जवानांनी पँगाँग त्सो तलावाच्या दक्षिण आणि उत्तरेकडेल किनाऱ्यावरुन मागे येण्यास सुरुवात केली आहे. चीनच्या सैन्याने आज (10 फेब्रुवारी) घोषणा केली केली. या ठिकाणी दोन्ही बाजूकडील जवान अनेक महिन्यांपासून एकमेकांसमोर उभे ठाकले होते. चीनच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितलं की, 24 जानेवारीला कॉर्प्स कमांडर स्तरातवरील चर्चेदरम्यान सहमती झाल्यावर सैनिकांना मागे घेण्याची सुरुवात झाली आहे.
चीनच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते कर्नल वु क्यान यांनी लेखी वक्तव्य जारी करताना म्हटलं की, चीन आणि भारताच्या फ्रंट लाईनवरील सैनिकांनी उत्तर आणि दक्षिण पँगाँग त्सो तलावावरुन मागे येण्यास सुरुवात केली आहे. भारत आणि चीन यांच्यात चर्चेच्या नवव्या फेरीत सहमती झाल्यावर हा निर्णय घेण्यात आला आहे.
तर दुसरीकडे भारतीय सैन्याच्या सूत्रांच्या माहितीनुसार पँगाँग त्सोसह प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या काही परिसरातून सैनिकांना मागे घेण्याबाबत सहमती झाली आणि त्यानंतर सैन्य मागे घेण्याचं कार्य सुरु करण्यात आलं.
Chinese and #Indian border troops on the southern and northern shores of #Pangong Lake began disengagement as planned on Wednesday according to the consensus reached during the ninth round of military commander-level talks: China's Ministry of National Defense pic.twitter.com/Af6NhoFjz3
— Global Times (@globaltimesnews) February 10, 2021
दरम्यान मागील वर्षी 5 मे रोजी लडाखच्या पँगाँग त्सो खोऱ्यात भारत आणि चीनमधील सैन्यामधील झटापटीनंतर प्रत्यक्ष सीमा रेषेवर तणावाचं वातावरण कायम आहे. यानंरत 15 जून रोजी गलवान खोऱ्यात झालेली हिंसक झटापट ही अनेक दशकांनंतर पाहायला मिळाली. या घटनेत दोन्ही बाजूकडचं मोठं नुकसान झालं होतं. गलवान खोऱ्यातील झटापटीत भारताचे 20 जवान शहीद झाले होते. तर चीनचे 40 पेक्षा जास्त जवान मृत्युमुखी पडले होते. मात्र चीने आपल्या मृत जवानांचा अधिकृत आकडा कधीही जगासमोर सांगितला नाही.
यानंतर तणाव कमी करण्यासाठी भारत आणि चीनमध्ये सैन्य तसंच कूटनिती स्तरावर सातत्याने चर्चा सुरु होती. त्यातच चीनने सुमारे 60 हजार जवानांसह मोठ्या संख्येंने लढाऊ विमानं आणि शस्त्र सीमेवर ठेवली होती. याच्या उत्तरादाखल भारताकडूनही तेवढ्याच संख्येने सैनिक, लढाऊ विमानं आणि शस्त्र तैनात करण्यात आली होती.