Chandrayaan 3 : चांद्रयान लॅंडिगच्या वेळीच बाळाचा जन्म! ओदिशातील लोकांनी बाळांचं नाव ठेवलं चांद्रयानावरुन
Chandrayaan 3 : चांद्रयान- 3 मोहीम फत्ते झाली आणि प्रत्येक भारतीयांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तराळले.
केंद्रपाडा (ओदिशा) : चांद्रयान- 3 मोहीम फत्ते झाली आणि प्रत्येक भारतीयांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तराळले. मनात आनंदाचे धबधधबे फुलून गेले. भारताच्याच नाही तर संपूर्ण जगाच्या इतिहासात, जिथं जगातलं कुणीच गेलेलं नाही, अशा दक्षिण ध्रुवाच्या उंबरठ्याला भारताने गवसणी घातलीय. चांद्रयानचे यशस्वी लँडिंग झाल्यानंतर भारतामध्ये प्रत्येक घरात आनंदाचे वातावरण होतं. चांद्रयान 3 ने चंद्राच्या पृष्ठभागावर पाऊल ठेवले, त्यावेळी ओदिशाच्या केंद्रपाडा जिल्ह्यात जन्मलेल्या अनेक बाळांची नावे 'चांद्रयान' ठेवण्यात आली. बुधवारी संध्याकाळी केंद्रपाडा जिल्हा रुग्णालयात जन्मलेल्या चार बाळांची नावे चांद्रयान ठेवली आहेत. यामध्ये तीन मुले आणि एक मुलगी, आहे.
चार बाळापैकी एकाचे वडील प्रवत मलिक म्हणाले की, ‘‘ आज दुहेरी आनंद झाला आहे. चांद्रयान 3 चे यशस्वी लँडिंग झाल्यानंतर काही मिनिटातच आमच्या बाळाचा जन्म झाला. आम्ही बाळाचे नाव चंद्र मोहिमेवर आधारित ठेवण्याचा निर्णय घेतला.’’ स्थानिक परंपरेनुसार, बाळाच्या जन्मानंतर 21 व्या दिवशी पूजा केल्यानंतर त्याचे नाव ठेवण्याची परंपरा आहे. अरिपाडा गावातील प्रवत मलिक यांच्या पत्नी रानू यांनी मुलाला जन्म दिला. रानू म्हणाल्या की, घरातील वडीलधाऱ्यांना मुलाचे नाव चांद्रयान ठेवण्याची विनंती करणार आहे. बाळाचे ना चंद्र अथवा लूना असेही होऊ शकते. मात्र, चांद्रयान हे एका नव्या शैलीचे नाव आहे. 21 तारखेला होणाऱ्या पूजेदरम्यान याबाबत निर्णय घेणार आहोत.
तालाचुआ गावातील दुर्गा मंडल, नीलकंठपुरमधील जोशन्यारानी बाल आणि अंगुलेई गावातील बेबिना सेठी यांनी बुधवारी रात्री बाळाला जन्म दिला. दुर्गाने मुलीला जन्म दिला तर अन्य दोघींनी मुलाला जन्म दिला. केंद्रपाडा येथील सरकारी रुग्णालयातील नर्स अंजना साहू यांनी सांगितले की, 'सर्वजण बाळाचे नाव चांद्रयानवर ठेवण्यास इच्छूक आहेत. याआधी राज्यात आलेल्या चक्रीवादळावरून अनेकांनी आपल्या मुलाचे नाव ठेवल्याचे आठवतेय.'
रुग्णालयाचे अतिरिक्त जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ.पी.के.प्रहराज म्हणाले की, चांद्रयान 3 पोहचलेल्या ऐतिहासिक क्षणी आपल्या मुलांचा जन्म झाल्यामुळे पालक स्वत:ला खूप भाग्यवान समजत आहेत. चंद्र मोहिमेतील भारताचे यश पाहून आपल्या मुलांचे नाव चंद्रयान 3 वर देत आहेत.