Chandrayaan 3: कोणत्याही परिस्थितीत चांद्रयान सुखरुपपणे चंद्रावर उतरणार: दा. कृ. सोमण
Chandrayaan 3: आजच्या चांद्रयान मोहिमेकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे, खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी चांद्रयान-3 बद्दल सविस्तर माहिती सांगितली आहे.
![Chandrayaan 3: कोणत्याही परिस्थितीत चांद्रयान सुखरुपपणे चंद्रावर उतरणार: दा. कृ. सोमण Chandrayaan 3 to be landed soon August 23 Will Be Written In Golden Letters In The History Of India say D K Soman Chandrayaan 3: कोणत्याही परिस्थितीत चांद्रयान सुखरुपपणे चंद्रावर उतरणार: दा. कृ. सोमण](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/23/330abf1122ac95849b0607ba501d59e01692790728152124_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Chandrayaan 3: भारताच्या चांद्रयान-3 (Chandrayaan 3) या मोहिमेकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे.आज भारतासाठी मोठा दिवस असल्याचं खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले असून चांद्रयान-3 बाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली आहे. चांद्रयान मोहीम आज पूर्णत्वास येणार आहे, विक्रम लँडर आज चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे. चांद्रयान मोहीम यशस्वी व्हावी यासाठी संपूर्ण देशभरात प्रार्थना केली जाते आहे, याच पार्श्वभूमीवर खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण काय म्हणतायत, हे पाहूया.
चांद्रयान सुखरुपपणे चंद्रावर उतरणार - दा. कृ. सोमण
भारताची चांद्रयान-2 मोहीम अपयशी ठरल्यानंतर इस्रोच्या वैज्ञानिकांनी यावेळी मात्र विशेष काळजी घेतल्याचं दा. कृ. सोमण म्हणाले. विक्रम लँडरच्या सेन्सर्सनी काम केलं नाही, तरीही चांद्रयान सुखरुपपणे चंद्रावर उतरणार आहे, असं ते म्हणाले. चांद्रयानावर चार मोटर्स आहेत, त्यातल्या दोन सुरु झाल्या तरीही सॉफ्ट लँडिंग होईल, असंही सोमण म्हणाले. सॉफ्ट लँडिंग झाल्यानंतर यावर बसवण्यात आलेली चार उपकरणं आपलं काम सुरु करतात.
'उंच सखल प्रदेश आला तरीही रोव्हर काम करणार'
विक्रम लँडरमधून एक रोव्हर बाहेर पडणार आहे. त्यानंतर हा रोव्हर चंद्रावर एका सेकंदाला एक सेंटीमीटर या गतीने फिरणार असल्याचं दा. कृ. सोमण म्हणाले. वाटेत उंच सखल प्रदेश आला तरीही तो काम करणार आहे. या रोव्हरची जी सहा चाकं आहेत त्यावर इस्रोचं बोधचिन्ह कोरलेलं आहे, अशी माहिती सोमण यांनी दिली.
'भारताचा तिरंगा आजपासून चंद्रावर फडकणार'
पुढे दा. कृ. सोमण यांनी म्हटलं आहे की, भारताचा तिरंगा आणि इस्रोचं बोधचिन्ह यांचे ठसे चंद्राच्या वाळूत उमटणार आहेत. तिथे वातावरण नसल्यामुळे उमटलेले ठसे कायम तिथेच राहणार आहेत. भारताचा तिरंगा देखील आजपासून चंद्रावर असणार आहे. विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर यांचं आयुष्य 14 दिवसांचं आहे. विक्रम लँडर असं नाव देण्यामागची प्रेरणा विक्रम साराभाई आहेत, असं ते म्हणाले. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडर आणि रोव्हर काम करणार आहेत, या दोघांवर चार मशिन्स बसवण्यात आल्या आहेत.
'आजचा दिवस भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरला जाणार'
भारत आज जागतिक विक्रम करणार असल्याचंही दा. कृ. सोमण म्हणाले. कमी खर्चात हे यान चंद्रावर उतरुन काम करणार आहे. चांद्रयान-2 मध्ये ऑर्बिटर होता, जो चंद्राभोवती अजूनही फिरत आहे. चांद्रयान-3 चा या ऑर्बिटरशी संपर्क झाला आणि दोघांनी एकमेकांना वेलकम केल्याचंही सोमण म्हणाले. आज २३ ऑगस्टला संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चंद्रावर विक्रम लँडर सॉफ्ट लँडिंग करेल. विक्रम साराभाईंना ही खऱ्या अर्थाने मानवंदना ठरणार आहे आणि आजचा दिवस भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरला जाणार आहे, असं दा. कृ. सोमण म्हणाले.
यानाचं लँडिंग दक्षिण ध्रुवावरच का?
चंद्रावर पाणी असल्याचे पुरावे आपल्याला चांद्रयान-1 ने दिले होते, आता त्याच्या शोधासाठी आपण चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आपलं यान उतरवणार आहे, असं दा. कृ. सोमण म्हणाले. या यानावरच्या मोटरने आणि रोव्हरने काम केलं नाही तरीही सॉफ्ट लँडिंग होईल, कारण इस्रोने याची काळजी घेतली असल्याचं ते म्हणाले. भारतीय बनावटीचं चांद्रयान-3 असून यामध्ये विविध कंपन्या सहभागी झाल्याचंही सोमण यांनी सांगितलं.
हेही वाचा:
Chandrayaan 3 : चांद्रयान-3 लॅंडर चंद्रावर उतरण्यासाठी सज्ज, वातावरण पोषक असल्याची ISRO ची माहिती
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)