Chandrayaan 3 Launch: चांद्रयान-3 यशस्वीरित्या अवकाशात झेपावले, उड्डाणानंतर इस्रोच्या शास्त्रज्ञांचा विजयी जल्लोष
तिसऱ्या चांद्रमोहिमेचा पहिला टप्पा यशस्वीपणे सर झाला आणि ‘चांद्रयान-3’ चंद्राच्या दिशेने मार्गस्थ झाले.
Chandrayaan 3 Launch: भारताचे ‘चांद्रयान-3’ (Chandrayaan-3) हे महत्त्वाकांक्षी यान शुक्रवारी दुपारी यशस्वीरीत्या चंद्राच्या दिशेने झेपावले आणि भारताने अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रात भरारी घेतली. ‘काउंट डाऊन’ संपताच ज्वाळांचे लोट खाली सारत इस्रोच्या 'बाहुबली रॉकेट' म्हणजेच LVM-3 मधून चांद्रयान-3 वेगाने आकाशाच्या दिशेने झेपावला. आसमंत हादरवणाऱ्या रॉकेटच्या आवाजात टाळ्या-शिट्ट्यांसह ‘भारत माता की जय’च्या घोषणाही निनादल्या.
श्रीहरीकोटा येथे देशभरातून आलेल्या आबालवृद्धांच्या समुदायाने भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) शास्त्रज्ञांची आणि स्वदेशी तंत्रज्ञानाची कमाल ‘याची देहि याची डोळा’ अनुभवली. देशाच्या तिसऱ्या चांद्रमोहिमेचा पहिला टप्पा यशस्वीपणे सर झाला आणि ‘चांद्रयान-3’ चंद्राच्या दिशेने मार्गस्थ झाले. इस्रोच्या शास्त्रज्ञांसह भारतीयांनी विजयी जल्लोष केला. भारताच्या या मोहिमेकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं होतं. भारताची चांद्रयान-तीन ही मोहीम यशस्वी ठरली तर अमेरिका, रशिया आणि चीननंतर चंद्रावर यान उतरवणारा भारत हा जगातील चौथा देश ठरला आहे. या मोहिमेसाठी भारताने तब्बल 615 कोटी रुपये खर्च केलेत. चांद्रयान-3 अंतराळयान 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याची अपेक्षा आहे. चांद्रयान-3 ने 40 दिवसांचा प्रवास पूर्ण केल्यानंतर विक्रम लँडरच्या साहाय्याने प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या दक्षिण धुव्रावर उतरेल.
Chandrayaan-3 mission: Spacecraft lifts off successfully from Sriharikota
— ANI Digital (@ani_digital) July 14, 2023
Read @ANI Story | https://t.co/8fATRuqkzy#ISRO #Chandrayaan3 #Sriharikota pic.twitter.com/2Pj1frPCBh
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार चांद्रयान-3
3.84 लाख किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर चांद्रयान-3 चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल. सर्व काही ठरल्याप्रमाणे पार पडलं तर, चांद्रयान 23 ऑगस्ट रोजी चंद्रावर उतरण्याची शक्यता आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडरचे उतरणं हे चांद्रयान-3 मोहिमेचं पहिलं लक्ष्य आहे. याआधीचा चांद्रयान-2 द्वारे चंद्रावर उतरण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला होता. त्यानंतर इस्रो पुन्हा चार वर्षानंतर चंद्रावर उतरण्याचा दुसरा प्रयत्न करणार आहे. रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरल्यानंतर तेथील माहिती गोळा करुन चंद्राची रहस्यं उलगडण्यास मदत होईल.
चांद्रयान-3 चे वातावरणापासून संरक्षण करणारी हीट शील्ड सुमारे 92 किमी उंचीवर रॉकेटपासून वेगळी होईल. 115 किमी अंतरावर चांद्रयानाचं इंजिन देखील वेगळं होईल आणि क्रायोजेनिक इंजिन कार्य करण्यास सुरुवात करेल. याचा वेग 16 हजार किमी प्रति तास असेल. क्रायोजेनिक इंजिन चांद्रयानाला 179 किमी अंतरापर्यंत घेऊन जाईल, तेव्हा त्याचा वेग 36968 किमी प्रति तास असेल. प्रक्षेपणाच्या 108 सेकंदांनंतर रॉकेटचं द्रव इंजिन 45 किमी उंचीवर सुरू होईल. त्यावेळी रॉकेटचा वेग ताशी 6437 किमी असेल. आकाशात 62 किमी उंचीवर गेल्यावर दोन्ही बूस्टर रॉकेटपासून वेगळे होतील आणि रॉकेटचा वेग ताशी 7 हजार किमी होईल.
'चांद्रयान 3'चं यशस्वी प्रक्षेपण