(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Chandrayaan-3 Mission : चार वर्षात चार देश चंद्रावर उतरण्यात अयशस्वी, भारताने पुन्हा मजल मारली
Chandrayaan-3 Landing, Moon Mission : गेल्या चार वर्षांत चार देशांनी चंद्रमोहिम हाती घेतली, पण त्यांना चंद्रावर उतरण्यात अपयश आलं आहे. विशेष म्हणजे अपयशानंतरही भारताने पुन्हा नव्या जोमानं चंद्रमोहिम हाती घेतली.
मुंबई : भारत नवा इतिहास रचण्यासाठी सज्ज झाला आहे. अवघ्या काही तासांत भारताचं चांद्रयान-3 (Chandrayaan-3) चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे. रशिया आणि भारतामध्ये चंद्रावर पोहोचण्याची शर्यत लागली होती. मात्र, रशियाचं लुना-25 यान चंद्रावर कोसळलं. आता जगाचं लक्ष भारताच्या चांद्रयान-3 कडे लागल्या आहेत. दरम्यान, फक्त रशियाचं नाही तर गेल्या चार वर्षात चार देश चंद्रावर पोहोचण्याच अयशस्वी ठरले आहेत.
चार वर्षात चार देशांना अपयश
गेल्या चार वर्षांत चार देशांनी चंद्रमोहिम हाती घेतली, पण त्यांना चंद्रावर उतरण्यात अपयश आलं आहे. विशेष म्हणजे चंद्रमोहिमेमध्ये अपयश आल्यानंतर भारत एकमेव देश आहे, ज्याने पुन्हा नव्या जोमानं चंद्रमोहिम हाती घेतली. चांद्रयान-2 च्या अपयशानंतर चंद्रावर परतण्याचं धाडस फक्त भारतानेच जमवलं आहे.
'या' देशांनी केले प्रयत्न
मागील चार वर्षात जगातील चार देशांनी चंद्रावर पोहोचण्याचा प्रयत्न केला. यामध्ये भारत, इस्रायल, जपान आणि रशिया या देशांचा समावेश आहे. भारताची चांद्रयान-2 मोहिम, इस्रायलची बेरेशीट मोहिम, जपानचं हकुटो-आर आणि रशिया लुना-25 यान चंद्रावर पोहोचण्यात अयशस्वी ठरलं. या सर्व देशांना चंद्रमोहिमेत अपयशाला सामोरं जावं लागलं. विशेष म्हणजे चारही देशाची मोहिम नेमकी चंद्रावरील लँडिंग आधी अपयशी ठरली. लँडिंगच्या अंतिम प्रक्रियेदरम्यान तांत्रिक अडचणीमुळे या मोहिमा अयशस्वी ठरल्या.
भारताची कामगिरी कौतुकास्पद
2019 मध्ये भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोची चांद्रयान-2 मोहिम अयशस्वी ठरली. लँडिगआधी चांद्रयान-2 च्या लँडरचा संपर्क तुटल्यानं भारताचं स्वप्न अपूर्ण राहिलं. मात्र, तरीही भारत हा एकमेव देश आहे, ज्याने अपयश पचवून नव्या जोमाने तयारी केली आणि आता चंद्रावर उतरण्यापासून काही पाऊलं दूर आहे. चांद्रयान-2 च्या अपयशानंतर संकटातून धडा घेत चांद्रयान-3 मध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत.
अमेरिका चंद्रावर पोहोचणारा पहिला देश
16 जुलै 1969 रोजी माणसानं चंद्रावर पहिलं पाऊल ठेवलं. नील आर्मस्ट्राँग हे चंद्रावर पहिलं पाऊल ठेवणारे व्यक्ती आहेत. नासाचं अपोलो-11 अंतराळात झेपावलं. अंतराळयान नील आर्मस्ट्राँग, बझ ऑल्ड्रिन 'या' अंतराळवीरांना घेऊन अपोलो-11अवकाशाकडे झेपावलं. अंतराळयानाला सॅटर्न फाईव SA506 या रॉकेटच्या मदतीने केनडी स्पेस सेंटरमधून अंतराळात सोडण्यात आलं.
चीनला पहिल्या प्रयत्नात चंद्रावर पोहोचण्यात यश
चीनलाही चंद्रावर उतरण्यात यश मिळालं आहे. चीन पहिल्याच प्रयत्नात चंद्रावर पोहोचला. मीडिया रिपोर्टनुसार, 2013 मध्ये चीनने चंद्रावर चांगई-3 यान यशस्वीरित्या उतरवलं होतं. तस्चे, 2019 मध्ये, चांग ई-4 चंद्रावर उतरण्यात देखील चीन यशस्वी झाला.
चांद्रयान-3 च्या लँडिंगची प्रतिक्षा
14 जुलै रोजी आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून चांद्रयान-3 चंद्रावर पाठवण्यात आलं. आता वेगवेगळ्या टप्प्यांच्या यशानंतर चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर 23 ऑगस्टला सॉफ्ट लँडिंग करणार आहे.