रक्त विकण्यासाठी नाही! आता रक्तपेढ्यांमध्ये भरमसाठ पैसे मोजण्याची गरज नाही; केवळ प्रक्रिया शुल्कच भरावं लागणार
Blood Bank Govt Guidelines: सरकारनं रक्तपेढ्यांसाठी नवी मार्गदर्शक तत्त्व जारी केली आहेत. सरकारकडे गेल्या काही दिवसांपासून रक्तपेढ्यांबाबत अनेक तक्रारी येत होत्या. त्यामुळे आता रक्तपेढ्या केवळ प्रक्रिया शुल्क आकारू शकतात, असं सरकारनं म्हटलं आहे.
Blood Bank Govt Guidelines: नवी दिल्ली : आता रक्तासाठी भरमसाठ पैसे मोजण्याची गरज भासणार नाही. रक्तपेढ्या (Blood Bank) केवळ प्रक्रिया शुल्कच आकारणार असल्याचा महत्त्वाचा निर्णय केंद्र सरकारच्या (Central Government) वतीनं घेण्यात आला आहे. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडून 'रक्त विकण्यासाठी नसतं', असं सांगत याबाबतची मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून रक्तपेढ्यांवर रक्त देताना जादा दर आकारले जात असल्याच्या तक्रारी सरकारकडे येत आहेत. रक्तपेढ्यांकडून जादा दर आकारल्याच्या तक्रारींवर केंद्र सरकारनं कडक भूमिका घेतली आहे. राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषदेनं (NBTC) जारी केलेल्या सुधारित मार्गदर्शक तत्त्वांचं काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना सरकारनं दिल्या आहेत. रक्तपेढ्या रक्ताची विक्री करू शकत नाहीत, असं म्हणत केंद्र सरकारनं सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या औषध नियंत्रकांना पत्रं लिहिली आहेत.
रक्तपेढ्या फक्त प्रक्रिया शुल्क आकारू शकतात : DCGI
सर्वोच्च औषध नियामकानं म्हटलं आहे की, रुग्णालयं आणि रक्तपेढ्या आता रक्तदान करण्यासाठी केवळ प्रक्रिया शुल्क आकारू शकतात. तसेच, अधिक शुल्क आकारण्याची प्रथा थांबविण्यासाठी नियामकानं इतर सर्व शुल्क काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या औषध नियंत्रकांना आणि सह-परवाना अधिकार्यांना पाठवलेल्या पत्रात, भारतीय औषध नियंत्रक जनरल (DCGI) नं लिहिलं आहे की, 'रक्त विक्रीसाठी नाही'. दरम्यान, रक्तपेढ्यांवर जादा शुल्क आकारलं जात असल्याचं सांगत हा निर्णय घेण्यात आला आहे.
Blood Bank Govt Guidelines: रक्त विकण्यासाठी नाही : DCGI
26 सप्टेंबर रोजी झालेल्या औषध सल्लागार समितीच्या 62 व्या बैठकीचा संदर्भ देत डीसीजीआयनं 26 डिसेंबर रोजी लिहिलेल्या पत्रात 'रक्तासाठी अधिक शुल्क आकारण्याबाबत एटीआर पॉइंट तीनच्या अजेंडा क्रमांक 18 संदर्भात शिफारस केली आहे.', असं मत व्यक्त करण्यात आलं आहे. रक्त विकण्यासाठी नाही, ते फक्त पुरवठ्यासाठी आहे, त्यामुळे रक्तपेढ्या केवळ प्रक्रिया शुल्क आकारू शकतात. DGCI नं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या औषध नियंत्रकांना त्यांच्या अधिकारक्षेत्रातील सर्व रक्तपेढ्यांना सुधारित मार्गदर्शक तत्त्वांचं पालन करण्याचे निर्देश देण्यास सांगितलं आहे.
अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रक्तदान न केल्यास खासगी रुग्णालयांकडून प्रति युनिट रक्ताची किंमत 3,000 ते 8,000 रुपये ठेवली जाते. रक्ताची कमतरता किंवा दुर्मिळ रक्तगटाच्या बाबतीत, हे शुल्क जास्त असू शकतं.
आता फक्त 1550 रुपयेच भरावे लागणार
रक्तदान केल्यानंतरही लोकांकडून नेहमीच प्रक्रिया शुल्क आकारलं जातं. अशातच, नव्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, केवळ प्रक्रिया शुल्क आकारलं जाऊ शकतं, जे रक्त किंवा रक्त घटकांसाठी 250 ते 1,550 रुपयांच्या दरम्यान आहे. उदाहरणार्थ, संपूर्ण रक्त किंवा पॅक केलेल्या लाल रक्तपेशींचं वितरण करताना 1,550 रुपये शुल्क आकारलं जाऊ शकतं, तर प्लाझ्मा आणि प्लेटलेट्सचे शुल्क प्रति पॅक 400 रुपये असेल.
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )