सपाला हरवण्यासाठी प्रसंगी बसपा भाजपलाही मतदान करेल : मायावती
भाजपबद्दल मायावतींची भाषा पूर्ण बदलली आहे. गरज पडली तर भाजपला मतदान करु पण सपाचा उमेदवार जिंकू देणार नाही असं आता मायावती म्हणत आहेत.
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत मोदींचं आव्हान रोखण्यासाठी एकमेकांचे कट्टर शत्रु असलेले पक्षही एक होताना दिसत होते. यूपीत मायावती-अखिलेश यांच्या एकत्र येण्याला अशाच ऐतिहासिक अँगलमधून पाहिलं गेलं. पण याच मायावतींनी आज प्रसंगी भाजपला मतदान करु पण सपाची खोड जिरवू असं विधान केलंय. अवघ्या काही महिन्यांत इतक्या का बदलल्या मायावती? सपाचा इतका द्वेष त्यांना का वाटू लागला ज्यासाठी त्या प्रसंगी भाजपला मदतीची पर्वा करत नाहीत.
अठरा महिन्यांपूर्वी जेव्हा अखिलेश यादव आणि मायावती लोकसभा निवडणुकीसाठी एकत्र आले. तेव्हा बुआ-बबुआची ही जोडी काय कमाल करेल अशी चर्चा सुरु झाली. पण मोदींच्या लाटेत या जोडीचं पानिपत झालं आणि त्यानंतर अवघ्या काही महिन्यांतच या दोघांमध्ये चांगलंच बिनसलं. ज्या भाजपला रोखण्यासाठी त्यांनी आपलं शत्रुत्व मागे ठेवलं होतं. आज त्याच भाजपबद्दल मायावतींची भाषा पूर्ण बदलली आहे. गरज पडली तर भाजपला मतदान करु पण सपाचा उमेदवार जिंकू देणार नाही असं आता मायावती म्हणत आहेत.
अचानक सपाबद्दल इतक्या मायावती कडवट होण्याचं कारण आहे 9 नोव्हेंबरला होणारी उत्तर प्रदेशची राज्यसभा निवडणूक.10 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. मतांच्या जोरावर भाजपचे 8 उमेदवार निवडून येतील आणि उरल्या दोन जागांसाठी सपाचे दोन तर बसपाचाही एक उमेदवार रिंगणात आहे. त्यामुळे राज्यसभेच्या या दोन जागांवरुन सपा-बसपात जुंपलीय.
उत्तर प्रदेशात एकही उमेदवार निवडून येऊ शकेल इतके आमदार बसपाकडे नाहीत. पण तरीही मायावतींनी रामजी गौतम यांना आपल्या पक्षाकडून रिंगणात उतरवलं आहे. पण त्यांच्या उमेदवारी अर्जावर ज्यांच्या सह्या होत्या, त्यातल्या 7 आमदारांनी आता यू टर्न घेतला आहे. आमचा या उमेदवाराला पाठिंबाच नाही असं ते म्हणत आहेत. हे आमदार सपाला मदत करण्याची शक्यता असल्यानं मायावती इतक्या संतापल्या आहेत.
मायावतींनी भाजपला मदत करु असं म्हटल्यावर त्यावर काँग्रेस महासचिव प्रियंका गांधींनीही निशाणा साधला. मायावती सतत भाजपलाच मदत होईल अशा गोष्टी करत असतात यावर हे शिक्कामोर्तब असल्याचं त्यांनी आपल्या ट्वीटमधून सुचवलं.
इसके बाद भी कुछ बाकी है? pic.twitter.com/WGNxMWq9gh
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) October 29, 2020
लोकसभा निवडणुकीवेळी जेव्हा सपा-बसपा एकत्र आले होते.त्यावेळी मायावतींनी मुलायम सिंह यांच्याविरोधात 1995 च्या हल्ल्यानंतर दाखल केलेली केसही मागे घेतली होती.आज ही केस मागे घेतल्याचा आपल्याला पश्चाताप होतोय असंही मायावती म्हणाल्या. समाजवादी पक्षानं रामगोपाल यादव यांना राज्यसभेसाठी उमेदवारी दिली. तर प्रकाश बजाज हे ज्येष्ठ वकील समाजवादी पुरस्कृत अपक्ष उमेदवार आहेत. त्यामुळे लोकसभेसाठी जी युती झाली होती ती अवघ्या एका राज्यसभेच्या जागेवरुन हमरीतुमरीवर आल्याचं दिसतंय.