पाकिस्तानच्या तीन वर्षीय मुलाने ओलांडली सीमा, बीएसएफने दिले पाक रेंजर्सच्या ताब्यात
BSF Handed Over Pakistani Child : अनवधानाने हद्द ओलांडल्यामुळे बीएसएफने शुक्रवारी रात्री पावणे दहा वाजता पाक रेंजर्सशी संपर्क साधला. यानंतर मुलाला पाक रेंजर्सच्या ताब्यात देण्यात आले.
BSF Handed Over Pakistani Child : चुकून सीमा ओलांडलेल्या तीन वर्षांच्या पाकिस्तानी मुलाला सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) पाकिस्तानच्या सुरक्षा जवानांच्या ताब्यात दिले आहे. सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी शुक्रवारी पंजाबच्या फिरोजपूर सेक्टरमधून एका पाकिस्तानी मुलाला पकडले. बीएसएफने सांगितले की, शुक्रवारी संध्याकाळी 7.15 च्या सुमारास फिरोजपूर सेक्टरच्या 182 बीएन बीएसएफच्या जवानांनी तीन वर्षाच्या एका पाकिस्तानी मुलाला पकडले. हे मुल सीमा ओलांडून भारतीय हद्दीत घुसले होते.
बीएसएफने एका निवेदनातून याबाबतची माहिती दिली आहे. " पाकिस्तानी हद्दीतून भारीतय हद्दीत आलेल्या मुलाला काहीही बोलता येत नव्हते. या मुलाला बीएसएफच्या सुरक्षित कोठडीत ठेवण्यात आले होते. अनवधानाने हद्द ओलांडल्यामुळे बीएसएफने शुक्रवारी रात्री पावणे दहा वाजता पाक रेंजर्सशी संपर्क साधला. यानंतर मुलाला पाक रेंजर्सच्या ताब्यात देण्यात आले, असे बीएसएफने आपल्या निवेदनात म्हटले आहे.
यापूर्वी 29 जून रोजी भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवरील सैन्यात बैठक झाली होती. बीएसएफच्या प्रवक्त्याने बुधवारी सांगितले की, 29 जून रोजी राजस्थानमध्ये आंतरराष्ट्रीय आघाडीवर भारत आणि पाकिस्तानच्या सीमा सैन्यादरम्यान ग्राउंड कमांडर स्तरावरील बैठक झाली. राज्यातील बारमेर जिल्ह्यातील मुनाबाव येथे मंगळवारी ही बैठक झाली. सीमा सुरक्षेशी संबंधित समस्यांचे निराकरण करण्यासाठी स्थानिक कमांडर (बटालियन) स्तरावर अशा बैठका घेतल्या जातात. बीएसएफ जम्मू आणि काश्मीर, पंजाब, राजस्थान आणि गुजरातच्या बाजूने जाणार्या 3,300 किमी लांबीच्या भारत-पाकिस्तान IB चे रक्षण करते.
पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालीवर बीएसएफची नजर
बीएसएफ सीमेवर सतत संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवून आहे. गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तानकडून भारताविरुद्ध ड्रोन कट रचला जात आहे. त्याचे लष्कर आणि दहशतवादी आयएसआयच्या सांगण्यावरून ड्रोनद्वारे शस्त्रे, ड्रग्ज आणि बॉम्ब पाठवण्याच्या तयारीत आहेत. पाकिस्तानच्या या हालचालींना हाणून पाडण्यासाठी सीमा सुरक्षा दलाने आंतरराष्ट्रीय सीमा आणि एलओसीवर मोबाइल हंटिंग पथक तैनात केले आहे.