(Source: ECI/ABP News/ABP Majha)
BRICS Summit : जेव्हा एकाच मंचावर आले पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती जिनपिंग; ब्रिक्सच्या परिषदेमध्ये नेमकं काय घडलं?
BRICS Summit : 15 व्या ब्रिक्स परिषदेमध्ये पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती जिनपिंग यांनी एकमेकांना स्मितहास्य करत हस्तांदोलन केलं.
भारत : दक्षिण आफ्रिकेमधील (South Africa) जोहान्सबर्ग येथे 15 व्या ब्रिक्स शिखर परिषदेचे (BRICS Summit) आयोजन करण्यात आलं आहे. या परिषदेसाठी अनेक देशांचे प्रतिनिधी दक्षिण आफ्रिकेमध्ये पोहचले आहेत. तसेच या परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग हे देखील जोहान्सबर्गमध्ये दाखल झाले आहेत. याच परिषदेदरम्यान चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे एकमेकांच्या समोर आले. ब्रिक्समध्ये ब्राझील, रशिया, चीन, भारत आणि दक्षिण आफ्रिका या देशांचा समावेश आहे.
जेव्हा ब्रिक्सचं कुटुंब म्हणून पाचही देशांचे प्रतिनिधी फोटोसाठी मंचावर गेले. त्यावेळी पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती जिनपिंग हे देखील मंचावर उपस्थित होते. त्यामुळे सगळ्यांच्या नजरा या दोन देशांच्या प्रतिनिधींकडे लागल्या होत्या. यावेळी ब्राझीलचे राष्ट्रपती लुइज इनासियो लुला दा सिल्वा, चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग, दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती सिरिल रामफोसा आणि रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव देखील उपस्थित होते.
जेव्हा पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती जिनपिंग आले समोरासमोर...
ब्रिक्समधील पाचही देशांचे प्रतिनिधी जेव्हा मंचावर आले तेव्हा पंतप्रधान मोदी देखील त्यांच्यासोबत होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अगदी सहज स्मितहास्य करताना पाहायला मिळाले. तर चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग हे थोडेफार अस्वस्थ वाटले. तर जेव्हा हे दोघेही समोर आले तेव्हा त्यांनी एकमेकांना पाहून स्मितहास्य केलं.
चांद्रयान - 3 यशाबद्दल ब्रिक्सच्या देशांनी दिल्या शुभेच्छा
यंदाचं ब्रिक्स परिषदेचं यजमानपद हे दक्षिण आफ्रिकेकडे आहे. यावेळी संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी अंतराळातील सहयोगाबद्दल देखील भाष्य केलं आहे. तर यावेळी भारताच्या चांद्रयान मोहिमेचं देखील या सर्वांना कौतुक केलं आहे आणि भारताला शुभेच्छा दिल्या आहेत.
भारताच्या चांद्रयानाने जेव्हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडींग केलं तेव्हा पंतप्रधान मोदी हे दक्षिण आफ्रिकेमधील जोहान्सबर्ग येथे होते. त्यांनी तिथूनच इस्रोच्या शास्रज्ञांचं कौतुक केलं. तसेच जोहान्सबर्गमध्ये उपस्थित असलेल्या इतर देशांच्या प्रतिनिधींनी पंतप्रधान मोदींचे अभिनंदन केले. आम्ही देखील भारताच्या आनंदात सहभागी आहोत असं दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती सिरिल रामफोसा यांनी म्हटलं आहे.
या ब्रिक्स परिषदेमध्ये इतर देशाचे देखील प्रतिनीधी उपस्थित होते. तर या ब्रिक्सच्या परिषदेमध्ये एकूण 40 देशांनी सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यामध्ये संयुक्त अरब अमिरात, इराण, सौदी अरेबिया, इंडोनेशिया या देशांचा समावेश आहे. त्यामुळे या ब्रिक्सच्या परिषदेकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलं आहे.