देशात काळ्या बुरशीच्या जवळपास 9000 केसेस; केंद्राकडून अॅम्फोटेरिसिन-बीच्या 23 हजार कुपी वितरीत
रोग प्रतिकारशक्ती कमकुवत असलेल्या लोकांना काळ्या बुरशीचा जास्त धोका आहे. सोबतच मधुमेह, मूत्रपिंड रोग, हृदयरोग आणि ज्यांना वयाशी संबंधित समस्या आहेत किंवा ज्यांना संधिवात सारख्या आजारांमुळे औषधे घ्यावी लागतात, अशा रुग्णांनाही याची लागण होण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली : देशात म्यूकरमायकोसिस अर्थात ब्लॅक फंगसचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. कोरोना विषाणूच्या दुसर्या लाटेनंतर काळ्या बुरशी आजाराचे प्रमाण वाढत आहे. आतापर्यंत देशात या गंभीर आजाराची सुमारे नऊ हजार केसेस नोंदवण्यात आल्या आहेत. अनेक राज्यांनी ब्लॅक फंगसला साथीचा रोग जाहीर देखील केला आहे. देशातील काळ्या बुरशीबद्दल नवीन माहिती जाणून घ्या.
कोणत्या लोकांना काळ्या बुरशीचा संसर्ग होण्याची भीती आहे?
कोरोना बाधित किंवा त्यातून बरे झालेल्या व्यक्तीला काळी बुरशीचा संसर्ग नाक, डोळे, सायनस आणि काही प्रकरणांमध्ये मेंदूलाही होता. ज्यांची रोग प्रतिकारशक्ती कमकुवत आहे, साखर, मूत्रपिंड रोग, हृदयरोग आणि ज्यांना वयाशी संबंधित समस्या आहेत किंवा ज्यांना संधिवात सारख्या आजारांमुळे औषधे घ्यावी लागता, अशा लोकांमध्ये काळ्या बुरशीचा आजार जास्त प्रमाणात पसरत आहे.
रूग्णांना स्टिरॉइड्स दिल्यास त्यांची प्रतिकारशक्ती कमी होते, ज्यामुळे बुरशीला वाढण्यास संधी मिळते. या प्रकरणात, डॉक्टरांच्या योग्य देखरेखीखाली स्टिरॉइड्सचा वापर योग्य पद्धतीने केला पाहिजे. कोरोना रूग्णांकरिता स्टिरॉइड्सला जीवनरक्षक उपचार मानले जाते, मात्र, याचे काही दुष्परिणामही समोर येत आहे.
राज्यांना अॅम्फोटेरिसिन-बीच्या 23680 व्हायल प्राप्त
केंद्रीय मंत्री सदानंद गौडा यांनी सांगितले आहे की काळ्या बुरशीचे वाढत्या केसेस लक्षात घेता सरकारने विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये अॅम्फोटेरिसिन-बीच्या 23 हजार 680 कुपी वितरीत केल्या आहेत. आंध्र प्रदेश, गुजरात, हरियाणा, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान आणि तेलंगणा येथे 75% औषधे दिली गेली आहेत. या राज्यात काळ्या बुरशीची प्रकरणे वाढत आहेत.
बंगालमध्ये 'ब्लॅक फंगस'मुळे पहिला मृत्यू
पश्चिम बंगालमध्ये ब्लॅक फंगसमुळे मृत्यूची पहिली घटना समोर आली आहे. कोलकाता येथील रुग्णालयात काळ्या बुरशीमुळे एका 32 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. कोलकाताच्या हरिदेवपूर येथील रहिवासी असलेल्या शम्पा चक्रवर्ती यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याने शंभूनाथ पंडित रुग्णालयात दाखल करण्यात आले. या महिलेला मधुमेहाचा त्रास असल्याने ती इन्सुलीन घेत होती. राज्यात सध्या पाच रुग्णांवर उपचार सुरू आहेत.