एक्स्प्लोर
भाजपकडून गोव्यात नेतृत्व बदलाबाबत चाचपणी सुरु, राज्यातले नेते चर्चेसाठी दिल्लीत
मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी पद सोडल्यानंतर आरोग्य मंत्री विश्वजीत राणे, सभापती डॉ. प्रमोद सावंत किंवा भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार विनय तेंडुलकर या तिघांपैकी एकाची मुख्यमंत्रिपदी वर्णी लागू शकते, अशी चर्चा आहे.

पणजी : गोव्यातील भाजप आघाडीचे घटक पक्ष असलेल्या गोवा फॉरवर्ड आणि मगोच्या नेत्यांनी आज भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीत राज्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली असून भाजप सरकारच्या नव्या नेतृत्वाबाबत गंभीरपणे विचार करत असल्याचं स्पष्ट झालंय. केंद्रीय आयुष मंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते श्रीपाद नाईक यांच्या नावाला सत्ताधारी गटातील घटक पक्षांचे अपेक्षित समर्थन मिळू शकले नाही. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत त्यांचे नाव शेवटच्या स्थानावर असल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी पद सोडल्यानंतर आरोग्य मंत्री विश्वजीत राणे, सभापती डॉ. प्रमोद सावंत किंवा भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार विनय तेंडुलकर या तिघांपैकी एकाची मुख्यमंत्रिपदी वर्णी लागू शकते, अशी चर्चा आहे. घटक पक्षातील गोवा फॉरवर्ड आणि अपक्ष अशा सहा आमदारांचं नेतृत्व करणारे विजय सरदेसाई यांनी आज दिल्लीत भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांची भेट घेऊन त्यांच्याशी नेतृत्व बदलाविषयी चर्चा केली. सभापती डॉ. सावंत आज दिल्लीत दाखल झाले. तर सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर शाह यांची आजच भेट घेणार आहेत. “मी अमित शहा यांची भेट घेतली. चर्चेवेळी भाजप गोव्यात स्थिर शासन तसेच चांगला नेता देण्याच्या विचारात आहे हे मला स्पष्ट जाणवले. मी आमची बाजू मांडली आहे. गोव्यातील जनतेला आत्ता काय वाटते त्यावरही मी त्यांच्याशी चर्चा केली आहे. चांगले नेतृत्व देण्याचा निर्णय भाजप लवकरच घेईल,” असे सरदेसाई यांनी बैठकी नंतर ट्वीट केले आहे. मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत खासदार आणि प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर, सभापती डॉ. प्रमोद सावंत आणि आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांची नावे पक्षाने विचारात घेतली आहेत. या तिघांबाबत चर्चा झाली असल्याला सरदेसाई यांनी दुजोरा दिला असल्याचे सांगितले जात आहे. सभापती डॉ. सावंत दिल्लीत दाखल झाले आहेत. ते अमित शाह यांची भेट घेतील. विश्वजीत राणे आणि सुदिन ढवळीकर हे दिल्लीत आहेत तेही शाह यांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत. गोव्यात भाजप आघाडीचेच सरकार रहावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेसच्या अन्य काही आमदारांना भाजपात आणण्याचे प्रयत्न अजूनही सुरू आहेत. काँग्रेसचे काही आमदार गोवा फॉरवर्डच्याही संपर्कात आहेत. त्यामुळे पुढील काही दिवस आमदार फुटण्याचे सत्र सुरूच राहणार आहे. दरम्यान गोव्यात विधानसभेची मध्यावधी निवडणूक होऊ नये यासाठी भाजपने काळजी घ्यावी. तसेच सर्वांना एकत्र घेऊन उर्वरित कार्यकाळ पूर्ण होईल असा नेता भाजपने निवडावा असे सरदेसाई यांनी शाह यांच्याशी झालेल्या चर्चेवेळी सुचवले आहे.
आणखी वाचा























