गुजरातचं मतदान संपण्याआधीच भाजपचं 'मिशन 2024' सुरू, लोकसभा निवडणुकीसाठी महत्वाच्या बैठकीला सुरुवात
Loksabha Elections: मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपच्या सरकारने 2014 नंतर प्रत्येक निवडणूक गांभीर्याने घेतल्याचं दिसून येत आहे. आता लोकसभेच्या निवडणुकीसाठी भाजपच्या मंथनाला सुरुवात झाली आहे.
नवी दिल्ली: एकीकडे गुजरात राज्याच्या विधानसभेसाठी निवडणूक सुरू असताना भाजपने 2024 सालच्या लोकसभेसाठी तयारी सुरू केल्याचं दिसून येत आहे. लोकसभेची निवडणूक 2024 मध्ये होणार असली तरी राजधानी दिल्लीत त्या दृष्टीनं महत्वाच्या बैठकीला सुरुवात झाली आहे, त्यासंबंधित मंथनं भाजपनं सुरु केलं आहे.
गुजरातमध्ये सकाळी मतदानाचं कर्तव्य पार पडलं, आणि लगोलग पुढच्या दोन तासांत पंतप्रधान मोदी दिल्लीत दाखल झाले. एकीकडे गुजरातचं मतदान पार पडत असतानाच भाजपची 2024 च्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु झाली आहे. भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या दोन दिवसांच्या बैठकीला दिल्लीत सुरुवात झाली, त्यासाठी पंतप्रधानांनी तातडीनं दिल्ली गाठली.
एक मिशन संपलं की भाजपने दुसऱ्या मिशनची तयारी सुरू केली आहे. 2014 पासून प्रत्येक निवडणूक गांभीर्यानं घेणाऱ्या भाजपचं हे सूत्रच बनलं आहे. पण यावेळचं वैशिष्ट्य म्हणजे यावेळी तर गुजरातचं मतदान संपण्याचीही वाट बघितली गेली नाही. खरंतर निकालानंतर बैठक झाली असती तर त्याच्या परिणामांसह रणनीती आखता आली असती. म्हणजे आपचा धोका खरंच आहे का, काँग्रेस किती वाढू शकते याचं उत्तर निकालात मिळालंच असतं. पण त्याच्या आधीच ही बैठक होत असल्यानं या टायमिंगचीही बरीच चर्चा झाली.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाच्या मुख्यालयात ही दोन दिवसांची बैठक पार पडत आहे. मंगळवारी पंतप्रधान मोदी यांच्या भाषणानं याचा समारोप होणार आहे. या बैठकीला भाजपचे राष्ट्रीय पदाधिकारी, सर्व राज्यांचे प्रदेशाध्यक्ष, प्रभारी यांचीही उपस्थिती आहे.
गुजरात संपताच भाजपची 2024 ची तयारी सुरु
- पुढच्या वर्षभरात कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ विधानसभा निवडणुका आहेत.
- भाजपच्या दक्षिण मोहीमेसाठी महत्वाची असलेली तेलंगणा निवडणूकही लोकसभेच्या आधी होण्याची शक्यता आहे.
- या निवडणुकांसह लोकसभेची तयारी करण्यासाठी या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
- केंद्र सरकारच्या योजना, कामं ही लोकांपर्यंत अधिकाधिक वेगानं पोहचवण्याबाबत चर्चा.
- जी 20 चं यजमानपद यावेळी भारताकडे असणार आहे, 2023 मध्ये होणाऱ्या या शिखर परिषदेच्या निमित्तानं भारताचा आंतरराष्ट्रीय राजकारणातला दबदबाही लोकांपुढे नेण्याचा भाजपचा प्लॅन आहे.
एकीकडे काँग्रेसची भारत जोडो यात्रा आता 26 जानेवारीच्या आसपास काश्मीरपर्यंतचा प्रवास पूर्ण करण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे भाजपनंही आता लोकसभेच्या दृष्टीनं हालचाली करायला सुरुवात केली आहे. निवडणुकांची तयारी म्हटलं तर अगदी एकच वर्ष हातात आहे. त्यामुळेही आता मिशन लोकसभेच्या रणनीतीला वेग आल्याचं दिसतंय.