(Source: ECI/ABP News/ABP Majha)
गांधी परिवार भ्रष्टाचाराची जननी, भाजपचा पलटवार
राहुल गांधी देशाची दिशाभूल करत असून त्यांनी केलेले सर्व आरोप चुकीचे असल्याचं केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी म्हटलं.
नवी दिल्ली : राफेल करारावर फ्रान्सच्या माजी राष्ट्राध्यक्षांच्या गौप्यस्फोटानंतर राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांवर भाजपने पलटवार केला आहे. राहुल गांधी देशाची दिशाभूल करत असून त्यांनी केलेले सर्व आरोप चुकीचे असल्याचं केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी म्हटलं.
राफेलची सर्व माहिती सार्वजनिक करून पाकिस्तानला मदत करण्याचा हेतू राहुल गांधी यांचा असल्याचा आरोपही रविशंकर प्रसाद यांनी केला. तसेच यूपीए सरकारनेच रिलायन्सशी बोलणी केल्याचे पुरावे आपल्याकडे असल्याचा दावाही त्यांनी केला.
राफेल डीलमध्ये रिलायन्सची निवड करण्यात भाजप सरकारची भूमिका नाही. राहुल गांधी यांचे आरोप निरर्थक असल्याचे रविशंकर प्रसाद यांनी सांगितलं. राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर खालच्या स्तरावर जाऊन टीका केली आहे. कोणत्याही पक्षाच्या अध्यक्षाने याआधी कोणत्याही पंतप्रधानांवर अशा पद्धतीने टीका केली नव्हती, असंही रविशंकर प्रसाद यांनी म्हटलं.
राहुल गांधी केवळ गांधी कुटुंबातून आल्याने काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत, मात्र या पदावर राहण्याची त्यांची योग्यता नाही. त्यामुळे त्यांच्याकडून वेगळी काही अपेक्षा नाही. मुळात काँग्रेस पक्षच भ्रष्टाचाराची जननी आहे. जो व्यक्ती भ्रष्टाचाऱ्याच्या आरोपांवरून जामिनावर बाहेर आहे, तो आज पंतप्रधानांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत असल्याचा पलटवार रविशंकर प्रसाद यांनी राहुल गांधींवर केला.
राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष फ्रान्स्वा ओलांद यांनी जे आरोप केले, त्यातून राफेल करारामध्ये भ्रष्टाचार झाल्याचं स्पष्ट होत आहे. याचाच अर्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चोरी केली आहे, हा देशाचा अपमान आहे. राफेल करारावरुन सरकारनं जनतेची, सैन्याची फसवणूक केल्याचा घणाघाती आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केला आहे.
सर्वसामान्य जनतेचा पैसा मोदींनी अनिल अंबानी यांच्या खिशात घातला. मोदींनी अंबानी यांना 30 हजार कोटी रुपयांचं गिफ्ट दिल्याचा आरोपही राहुल यांनी केला आहे. तर या घोटाळ्याची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणीही राहुल गांधी यांनी केली आहे.
संबंधित बातम्या
फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष मोदींना चोर म्हणाले, राहुल गांधींचा आरोप
राफेल विमान करार : भारताने फक्त रिलायन्सचं नाव सुचवलं : ओलांद