(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'नमस्ते इवांका'; डोनाल्ड ट्रम्पसोबत इवांका ट्रम्पही येणार भारतात
अहमदाबादमध्ये पीएम मोदी आणि ट्रम्प जवळपास 22 किलोमीटरचा प्रवास रस्तामार्गाने करणार आहेत. जगातील सर्वात मोठी महासत्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव मोटेरा स्टेडियममधील प्रत्येक कोपरा CCTVच्या नजरेत असणार आहे.
नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यावर येणार आहेत. पण अशातच त्यांच्या दौऱ्याबाबत एक मोठी बातमी हाती आली आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या पत्नीसोबत आता मुलगी इवांका ट्रम्प आपल्या पतीसह भारत दौऱ्यावर येणार आहेत. इवांका ट्रम्पचा हा दुसरा भारत दौरा असणार आहे. याआधी इवांका 2017मध्ये हैदराबादमधील ग्लोबल बिजनेस समिटमध्ये सहभागी होण्यासाठी आली होती. परंतु, डोनाल्ड ट्रम्प यांचे जावई जेरेड कुशनर यांचा हा पहिलाच भारत दौरा असणार आहे.
दरम्यान, आतापर्यंत इवांका ट्रम्प भारत दौऱ्यावर का येणार आहे, याबाबत अद्याप काहीही माहिती नाही. दरम्यान, इवांका अनेकदा नरेंद्र मोदी आणि भारताची प्रशंसा करत असते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 24 फेब्रुवारीला दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची पत्नी मेलानिया ट्रम्प देखील असणार आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एक जनसभाही करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सर्वात मोठ्या मोटेरा स्टेडियमध्ये ही सभा होण्याची शक्यता आहे. डोनाल्ड ट्रम्प पत्नी मेलानिया सोबत अहमदाबाद आणि नवी दिल्ली येथे जाणार आहेत.
अहमदाबादमध्ये पीएम मोदी आणि ट्रम्प जवळपास 22 किलोमीटरचा प्रवास रस्तामार्गाने करणार आहेत. जगातील सर्वात मोठी महासत्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव मोटेरा स्टेडियममधील प्रत्येक कोपरा CCTVच्या नजरेत असणार आहे. रोड शो दरम्यान एनएसजी कमांडो आणि अमेरिकेतील स्नायपर्स ठिकठिकाणी तैनात करण्यात येणार आहेत.
हेलिकॉप्टरच्या माध्यमातून शहरात गस्त घालणार
ट्रम्प यांच्या दौऱ्यामुळे हेलीकॉप्टरमार्फत संपूर्ण शहरात चोख बंदोबस्त असणार आहे. तसेच अमेरिकन स्नायपर्स, सीसीटिव्ही यांमार्फत नजर ठेवण्यात येणार आहे. एवढचं नाहीतर संपूर्ण शहरावर हेलिकॉप्टरच्या मदतीने नजर ठेवली जाणार आहे. अहमदाबादमध्ये 11 हजारपेक्षा अधिक पोलीस तैनात करण्यात आले आहेत. पीएम मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प साबरमती नदीवर काही वेळ थांबणार असल्याचीही माहिती मिळत आहे.
24 फेब्रुवारीचा डोनाल्ड यांचा कार्यक्रम
12.00 : दुपारी 12 वाजता डोनाल्ड ट्रम्प भारतात येणार. पंतप्रधान नरेद्र मोदी त्यांना घेण्यासाठी अहमदाबाद एअरपोर्टला जाणार आहे. यावेळी त्यांचा गार्ड ऑफ ऑनरने सन्मान करण्यात येणार आहे. त्यानंतर ते साबरमती आश्रमला भेट देणार आहे. साबरमती आश्रमात ते 20 मिनीटे थांबणार आहे.
1.15 : जगातील सर्वात मोठ्या मोटेरा स्टेडियमचे ते उद्घाटन करणार आहे. या वेळी नमस्ते ट्रम्प हा कार्यक्रम होणार आहे.
3.30 : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी आग्र्यासाठी रवाना होतील.
4.30 : ट्रम्प ताजमहाल पाहण्सासाठी जाणार आहे. त्यांना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सायंकाळी पाच वाजता ताजमहाल पाहण्यासाठी घेऊन जाणार आहे. ताजमहालला भेट दिल्यानंतर सायंकाळी 5.30 वाजता दिल्लीला येणार आहे.
25 फेब्रुवारीचा कार्यक्रम
सकाळी 9.00 : ट्रम्प यांचे राष्ट्रपती भवन येथे स्वागत
सकाळी 11.30 : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात नवी दिल्लीतील हैदराबाद हाऊस येथे द्विपक्षीय चर्चा होईल. दरम्यान, मेलानिया ट्रम्प दिल्ली सरकारच्या शासकीय शाळेला भेट देणार आहे आणि मुलांना भेटणार आहे.
दुपारी 4 30 : अमेरिकेचे अध्यक्ष दूतावासातील कर्मचार्यांना भेट देणार आहे.
रात्री 8.00 : रात्री आठ वाजता राष्ट्रपती भवनात या दोघांसाठी जेवणाचे आयोजन केले आहे.
रात्री 10 : डोनाल्ड ट्रम्प दहा वाजता पत्नीसह जर्मनीला रवाना होणार आहे.
संबंधित बातम्या :
Namaste Trump | कार्यक्रम खासगी संस्थेचा, मग सरकारकडून कोट्यवधींचा खर्च का? : काँग्रेस
जाणून घ्या कसा असणार डोनाल्ड ट्रम्प यांचा भारत दौरा