Ashneer Grover: अश्नीर ग्रोव्हर यांच्या अडचणी वाढल्या, पत्नीविरुद्ध BharatPe कडून न्यायालयीन खटला दाखल
Ashneer Grover News Update: भारतपे कंपनीकडून सुमारे 80 कोटींहून अधिक रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Ashneer Grover: भारतपेचे माजी एमडी आणि सह-संस्थापक अश्नीर ग्रोव्हर (Ashneer Grover) यांच्या अडचणी वाढल्या आहेत. भारतपेने (BharatPe)अश्नीर ग्रोव्हर यांची पत्नी आणि कंपनीच्या माजी अधिकारी माधुरी जैन (Madhuri Jain) यांच्याविरुद्ध IPC कलम 420 अंतर्गत न्यायालयीन खटला दाखल केला आहे. या प्रकरणावर दिल्ली उच्च न्यायालयात (Delhi High Court) सुनावणी होणार आहे. भारतपे कंपनीने निधीचा गैरवापर केल्याच्या आरोपाखाली अश्नीर ग्रोव्हर आणि त्यांच्या पत्नीला कंपनीतून बाहेरचा रस्ता दाखवला होता. याप्रकरणी भारतपे कंपनीकडून सुमारे 80 कोटींहून अधिक रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सात वर्षांपर्यंतची शिक्षा
IPC चे कलम 420 फसवणूक आणि निधीचा गैरवापर केल्याच्या गुन्ह्याशी संबंधित आहे. या गुन्ह्यात कमाल सात वर्षांपर्यंतची शिक्षा आणि दंडही ठोठावण्यात येतो. दरम्यान फेब्रुवारी 2022 मध्ये अश्नीर ग्रोव्हर आणि माधुरी जैन यांच्यावर निधीचा गैरवापर केल्याचा आरोप करण्यात आला होता. अल्वारेझ आणि मार्सल यांच्या प्राथमिक अहवालाच्या निष्कर्षांच्या आधारे कंपनीतून बाहेर काढण्यात आले होते. हा अहवाल भारतपे बोर्डासमोर ठेवण्यात आला होता. भारतपे बोर्डाने प्राथमिक चौकशीतच ग्रोव्हर आणि त्यांच्या पत्नीला बाहेरचा रस्ता दाखवला होता.
अश्नीर ग्रोव्हरने कंपनीच्या खात्यातून पैसे काढले
भारत पे ने दिलेल्या माहितीनुसार, ग्रोव्हर कुटुंब आणि त्यांच्या नातेवाईकांनी कंपनीच्या निधीमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता केली आहे. ते येथेच थांबले नाहीत, बनावट विक्रेते तयार करून कंपनीच्या खात्यातून पैसे उकळले गेले आणि कंपनीच्या पैशांचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर झाला. BharatPe ने म्हटले, मंगळवारी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक झाली, ती रात्री उशिरापर्यंत चालली. या बैठकीत ग्रोव्हरच्या केलेल्या गैरव्यवहार बाबत चर्चा झाली. बैठकीनंतर कंपनीने दिलेल्या निवेदनात ग्रोव्हर यांना सर्व पदांवरून हटवल्याची माहिती देण्यात आली आहे. लेखापरीक्षण अहवालात समोर आलेल्या तथ्यांच्या आधारे कारवाई करण्याचा अधिकार असल्याचे भारतपे कडून सांगण्यात आले.
भारतपेच्या बोर्ड सदस्यांवर निशाणा
यापूर्वी अश्नीर ग्रोव्हरने भारतपेच्या बोर्ड सदस्यांवर निशाणा साधला होता. Ashneer Grover ने BharatPe च्या आर्थिक कामगिरीबद्दल कंपनीच्या बोर्ड सदस्यांना गोत्यात आणले होते. अशनीर ग्रोव्हरने बोर्डाचे अध्यक्ष रजनीश कुमार आणि सीईओ सुहेल समीर यांच्यावर देखील निशाणा साधला.
अश्नीरने कंपनीला म्हटले होते Goodluck
अश्नीर म्हणाले होते, मला आशा आहे की संचालक मंडळ लवकरच काम सुरू करेल. एक स्टेकहोल्डर या नात्याने, मला कंपनीचे मुल्यांकन घसरल्याबद्दल काळजी वाटते. मी कंपनी आणि संचालक मंडळाला लवकर पुनर्प्राप्तीसाठी शुभेच्छा देतो.