पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज बाळासाहेब विखे पाटील यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (13 ऑक्टोबर) सकाळी 11 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून डॉ बाळासाहेब विखे पाटील यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन होणार आहे.
मुंबई : भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे वडील दिवंगत बाळासाहेब विखे पाटील यांच्या पुस्तकाचं प्रकाशन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. ही माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून दिली आहे. या प्रकाशनाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऑनलाईन उपस्थित राहणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (13 ऑक्टोबर) सकाळी 11 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून डॉ बाळासाहेब विखे पाटील यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन होणार आहे. तसेच विखे पाटील यांच्या सन्मानार्थ प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे नामांतर करुन, त्या संस्थेला ‘लोकनेते डॉ बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था’असे नाव दिले जाणार आहे.
मी उद्या सकाळी अकरा वाजता व्हिडिओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून श्री बाळासाहेब विखे पाटील यांचे आत्मचरित्र प्रकाशित करणार आहे. कृषी आणि सहकारक्षेत्र मजबूत करण्यासाठीचे त्यांचे प्रयत्न नेहमी स्मरणात राहतील. हा कार्यक्रम नक्की बघा.
— Narendra Modi (@narendramodi) October 12, 2020
डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी अनेकदा लोकसभेत अहमदनगर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले होते. त्यांचे आत्मचरित्र, “देह वेचावा कारणी” त्यांच्या प्रदीर्घ सामाजिक आणि राजकीय कारकीर्दीतील त्याच्या सेवाव्रती जीवनाचा आणि कृषी तसेच सहकार क्षेत्रात त्यांनी केलेल्या विविध पथदर्शी कामांचा आलेख मांडणारे आहे.
अहमदनगर जिल्ह्यात लोणी येथे 1964 साली प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेची स्थापना करण्यात आली. ग्रामीण विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण आणि मुलींना शैक्षणिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने ही संस्था स्थापन करण्यात आली होती. सध्या या संस्थेमार्फत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, शारीरिक आणि मानसिक अशा सर्वांगीण उन्नतीसाठी अनेक उपक्रम राबवले जात आहेत.