अयोध्यानगरीला अभेद्य किल्ल्याचं स्वरुप! शहरात प्रवेश करताना स्थानिकांनाही दाखवावं लागणार ओळखपत्र
Ram Mandir : राम मंदिर सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अयोध्येत कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आलीये. तसेच अनेक स्तरांवर सध्या सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.

मुंबई : अयोध्येत (Ayodhya) 22 जानेवारीला होणाऱ्या रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची सर्व तयारी पूर्ण झालीये. या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अयोध्येतील सुरक्षा व्यवस्था देखील कडक करण्यात आलीये. तसेच आता राम मंदिराच्या (Ram Mandir) उद्घाटनाच्या दिवशी अयोध्येत राहणाऱ्या लोकांनाही शहरात प्रवेश घेताना त्यांचे ओळखपत्र दाखवावे लागणार आहे. एवढेच नाही तर मंदिराच्या सुरक्षेसाठी तीन स्तरावरील सुरक्षा दल तैनात करण्यात आलंय.
अयोध्येतील या भव्य दिव्य सोहळ्याचे आमंत्रण अनेक दिग्गजांना देण्यात आलंय. त्यामुळे सुरक्षा व्यवस्थेचे देखील त्याप्रमाणे नियोजन करण्यात आलंय. यावेळी अनेक व्हीयायपी आणि व्हीव्हीआयपी पाहुणे उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आलीये. त्याच पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश पोलिसांसह केंद्रीय यंत्रणांकडूनही सुरक्षेत कोणतीही त्रुटी राहणार नाही, याची काळजी घेतली जातेय. त्यामुळे आता नागरिकांना देखील त्यांचे ओळखपत्र दाखवावे लागणार आहे.
अयोध्येची सीमा सील
शनिवारपासून (20 जानेवारी) अयोध्येची सीमा सील करण्यात आली असून बाहेरील लोकांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. वाहतुकीच्या दृष्टीने शुक्रवारी (19 जानेवारी) रात्रीपासून वाहतूक वळवण्यात आली आहे. अमेठी, सुलतानपूर, गोंडा, लखनौ, बस्ती येथून अयोध्येच्या दिशेने येणाऱ्या गाड्या वेगवेगळ्या मार्गाने त्यांच्या इच्छित स्थळी पाठवण्याची तयारी सुरू आहे.
मंदिर परिसरात कडेकोट बंदोबस्त
मंदिराच्या सुरक्षेसाठी केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) आणि पीएसी तैनात करण्यात आले आहे. शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश पोलिसांनी अतिरिक्त सैनिक तैनात केलेत. याशिवाय एआय, सीसीटीव्ही आणि ड्रोनच्या माध्यमातून शहरावर नजर ठेवली जाईल. 22 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते हा प्राणप्रतिष्ठापनेचा सोहळा पार पडणार आहे.पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी असेलेले स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप (SPG) देखील अयोध्येतील सुरक्षा व्यवस्था पाहत आहेत. तसेच उत्तर प्रदेश पोलीस आणि पीएसीचे 1400 अधिकारी मंदिर परिसराच्या बाहेर रेड झोनमध्ये तैनात असतील.
अवघ्या काही तासांवर अयोध्येतील राम मंदिराचा सोहळा येऊन ठेपला आहे. त्यासाठी संपूर्ण अयोध्येसह संपूर्ण देशात उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय. तसेच या सोहळ्यासाठी अनेक दिग्गज निमंत्रित आहेत. या सोहळ्याला कोणत्याही प्रकारचं गालबोट लागू नये यासाठी सुरक्षा व्यवस्थेचं नियोजन करण्यात आलंय.तसेच या सुरक्षेव्यवस्थेसाठी केंद्रीय यंत्रणा देखील सज्जा झाल्याचं पाहायला मिळतं आहे.
हेही वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
