सुप्रीम कोर्टावर ट्वीट करणं कुणाला कामराला महागात, न्यायालयाच्या अवमान प्रकरणी खटला चालणार
स्टॅण्ड अप कॉमेडियन कुणाल कामरा यांच्याविरोधात न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी खटला चालवण्याची परवानगी अॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी दिली आहे.
नवी दिल्ली : स्टॅण्ड अप कॉमेडियन कुणाल कामराविरोधात न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी खटला चालणार आहे. रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना सुप्रीम कोर्टाने अंतरिम जामीन मंजूर केल्यानंतर कामरा यांनी सर्वोच्च न्यायालयावर टीका केली होती. या ट्वीटमुळे कोर्टाचा आणि न्यायमूर्तीचा अवमान झाल्याचा दावा करत वकील रिझवान सिद्दीकी यांनी अॅटर्नी जनरल यांच्याकडे याबाबत पत्र लिहिलं होतं. त्यानंतर आता कामरा यांच्याविरोधात न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी खटला चालवण्याची परवानगी अॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी दिली आहे.
वेणुगोपाल म्हणाले, कामरा यांचं ट्विट सर्वोच्च न्यायालयचा अपमान करणारं आहे. आज काल लोक उघडपणे सर्वोच्च न्यायालयावर टीका करत आहे. हा त्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग वाटतो. विनोद आणि अपमान यांच्यात एक सीमारेषा असते. जी सीमारेषा कामरा यांनी ओलंडली आहे. सर्वोच्च न्यायालयावर टीका केल्याने शिक्षेला सामोरे जाव लागतं हे लोकांना कळालं पाहिजे.
सुप्रीम कोर्टाने बुधवारी अर्णब गोस्वामी आणि इतर दोन आरोपींची अंतरिम जामीनावर सुटका करण्याचा आदेश दिला होता. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर अर्णब गोस्वामी यांना रात्री जेलमधून सोडण्यात आलं. त्यांच्या सुटकेनंतर सोशल मीडियावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. याबाबत कुणाल कामरानेही ट्वीट केलं होतं. ज्यात त्याने लिहिलं होतं की, "ज्या वेगाने सुप्रीम कोर्ट देशातील महत्त्वाचे मुद्दे मार्गी लावत आहे ते पाहता लवकरच महात्मा गांधीजींच्या फोटोची जागा हरिश साळवे घेतील."
आणखी एका ट्वीटमध्ये कुणाल कामराने लिहिलं आहे की, "डी वाय चंद्रचूड एक फ्लाईट अटेन्डंट आहेत जे फर्स्ट क्लासमधील प्रवाशांना शॅम्पेन ऑफर करतात, कारण ते फास्ट ट्रॅक्ड आहेत. तर सामान्यांना हे माहितच नाही की त्यांना प्रवेश मिळेल, किंवा बसायला मिळेल. सर्व्ह करण्याचा बाब दूरच राहिली."
संबंधित बातम्या :
- अर्णब गोस्वामींबाबत सुप्रीम कोर्टाच्या निकालावर ट्वीट, कुणाला कामराविरोधात अवमानना खटला चालवण्याची मागणी
- 'खेळ आता सुरु झालाय...'; जामीनानंतर अर्णब गोस्वामी यांचा सरकारला थेट इशारा
- Arnab Goswami: अर्णब गोस्वामी यांना जामीन मंजूर, सर्वोच्च न्यायालयात आज काय घडलं?
- आईच्या हत्येनंतर अन्वय नाईक यांनी आत्महत्या केली असावी, अर्णब गोस्वामींचे वकील हरिश साळवेंचा युक्तिवाद