Assam Floods: आसाममध्ये 42 लाख नागरिकांना पुराचा फटका, 32 जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत
आसाममध्ये पुराचा जवळपास 42 लाख नागरिकांना फटका बसला आहे. अनेक जण बेघर झाले आहेत. 32 जिल्हे या पुराच्या पाण्यामुळं प्रभावीत झाले आहेत.
Assam Floods : आसाममध्ये मुसळधार पावसामुळं गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी पूर आल्यामुळं तेथील जनजीवन विस्कळीत झालं आहे. आसाममध्ये या पुराचा जवळपास 42 लाख नागरिकांना फटका बसला आहे. अनेक जण बेघर झाले आहेत. 32 जिल्हे या पुराच्या पाण्यामुळं प्रभावीत झाले आहेत. पुरामुळं शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून गेल्या आहेत. शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. रस्ते पाण्याखाली गेल्यानं, नागरिकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करणं देखील कठीण झाल आहे. दरम्यान, भारतीय लष्कराकडून सातत्याने मदत आणि बचावकार्य सुरु आहे.
पुराच्या पाण्याचा आसाममधील 42 लाख लोकांना फटका बसला आहे. तर हजारो लोकांनी त्यांची राहती घरं सोडावी लागली आहेत. त्याचबरोबर भारतीय लष्कराकडून सातत्यानं मदत आणि बचाव कार्य सुरु आहे. एका अधिकृत निवेदनात अशी माहिती देण्यात आली आहे की, गंभीर रुग्ण, वृद्ध महिला आणि लहान मुलांसह सुमारे 4 हजार 500 अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्यात आली आहे.
लष्कराचे बचाव कार्य सुरु
लष्कराच्या जवानांचे बचाव आणि मदतकार्य सुरुच आहे. बचाव मोहिमेसोबतच लष्कराचे जवान हजारो लोकांना मदत करण्यासाठी मदत छावण्यांमध्ये आवश्यक वस्तूंचा वेळेवर पुरवठा सुनिश्चित करत आहेत. पुराच्या पाण्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढत आहेत. आसाममधील कछार जिल्ह्यात संततधार सुरु आहे. या पावसामुळं झालेल्या भूस्खलनामुळं ढिगाऱ्याखाली अडकून दोन जणांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना कछार जिल्ह्यातील बोराखाई चहाच्या बागेतील आहे. मुसळधार पावसामुळं झालेल्या भूस्खलनात डोंगराचा मोठा भाग घरावर घसरला. त्यामुळं ढिगाऱ्याखाली अडकून दोघांचा मृत्यू झाला.
पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये 43 हजार 338 हेक्टर पीक जमीन पाण्याखाली गेली आहे. बेकी, मानस, पगलाडिया, पुथिमारी, जिया भराली, कोपिली येथे ब्रह्मपुत्रा नदीच्या पाण्याची पातळी धोक्याची पातळी ओलांडली आहे. सध्या जिल्हा प्रशासनाने उभारलेल्या 373 मदत केंद्रात 1 लाख 8 हजार 104 पूरग्रस्त लोक राहत आहेत. तर, बजली जिल्ह्यात 3.55 लाख, दरंग जिल्ह्यात 2.90 लाख, गोलपारा येथे 1.84 लाख, बारपेटा 1.69 लाख, नलबारी 1.23 लाख, कामरूपमध्ये 1.19 लाख आणि होजई जिल्ह्यात 1.05 लाख लोक बाधित झाले आहेत.