पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि एमआयडीसी यांची समन्वय समिती : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
पंचगंगेच्या प्रदूषणासाठी कारणीभूत असणाऱ्या तसेच सांडपाण्यावर योग्य प्रक्रिया न करता ते पंचगंगेत सोडणाऱ्या उद्योगांवर कारवाई करण्यात यावी, त्यांना थेट टाळे लावण्यात यावे अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या.
पंचगंगेच्या प्रदूषणासाठी कारणीभूत असणाऱ्या, सांडपाण्यावर योग्य प्रक्रिया न करता ते पंचगंगेत सोडणाऱ्या, नदी प्रदूषण नियंत्रणासंदर्भातील नियमांचे उल्लंघन करणाऱ्या उद्योगांवर कारवाई करण्यात यावी, त्यांना थेट टाळे लावण्यात यावे व त्यांनी नियमांची पुर्तता केल्यानंतरच टाळे उघडण्यात यावे, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.
मुख्यमंत्री म्हणाले, पंचगांगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी शासन कार्यवाही तर करेलच, पण त्याचबरोबर ज्यांच्यामुळे हे प्रदूषण होते त्यांचीही ते रोखण्यासाठी जबाबदारी निश्चित करणे गरजेचे आहे. नदी परिसरातील कोल्हापूर महापालिका, इतर नगरपालिका, गावे, इचलकरंजीतील वस्त्रोद्योग युनिटस्, एमआयडीसी आदी ठिकामांवरुन नदीचे होत असलेले प्रदूषण रोखण्यासाठी करावयाच्या विविध उपाययोजनांसंदर्भातील सविस्तर आराखडा सादर करण्यात यावा. यासाठी आवश्यक निधी शासनामार्फत उपलब्ध करुन देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
पंचगंगा परिसरातील जे कारखाने नियमांचे उल्लंघन करुन नदी प्रदूषणास कारणीभूत ठरतात त्यांना थेट टाळे लावण्याची कारवाई त्यांच्यावर करण्यात यावी. प्रदूषण रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची त्यांनी पूर्तता केल्यानंतर आणि कारखान्यात तशी यंत्रणा बसविल्यानंतरच हे टाळे उघडण्यात यावे, अशा कडक सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.
नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी आंदोलन करणाऱ्या ज्या आंदोलनकर्त्यांवर थेट सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नासारखे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत ते मागे घेण्यासंदर्भात सहानुभुतीपूर्वक विचार करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की, देशातील तथा राज्यातील बऱ्याच नद्या प्रदूषीत आहेत. पण पंचगंगेच्या बाबतीत मात्र हे प्रदूषण तीव्र असल्याचे दिसते. त्यामुळे नदीतील मासे मरुन ते पाण्यावर तरंगण्यासारख्या गंभीर घटना घडत आहेत. यासाठी पाण्यातील नेमके कोणते रासायनिक प्रदूषण, विषारी घटक कारणीभूत ठरले ते सुनिश्चित करुन ते रोखण्यासाठी प्राधान्याने उपाययोजना करणे आवश्यक आहेत. या नदीच्या प्रदूषणासंदर्भात थर्ड पार्टी ऑडीट करणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. पंचगंगा प्रदूषण रोखण्यासाठी पर्यावरण विभागामार्फत दर महिन्याला नियमीत बैठक घेऊन प्रगतीचा आढावा घेण्यात येईल. एमआयडीसी आणि एमपीसीबी यांच्या समन्वय समितीने वेळोवेळी आढावा घेऊन दर महिन्याच्या 5 तारखेला त्याचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर करावा, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.