वेस्टर्न रेल्वेमार्गावर मोठा अनर्थ टळला! रुळ वाकलेला दिसताच मोटरमनने विरार-चर्चगेट एसी ट्रेनला जागच्या जागी ब्रेक मारला
मंगळवारी दुपारी १२.४५ ला विरारहून सुटलेली एसी लोकल विरार-नालासोपारा स्थानकादरम्यान आली असता मोटरमनच्या लक्षात वाकलेला रेल्वे रुळ आला
Mumbai: विरारहून मुंबईकडे जाणाऱ्या फास्ट लाईनच्या अप मार्गावर काल मंगळवारी रेल्वे रुळ वाकल्याची घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली होती. मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे विरार चर्चगेट एसी ट्रेनचा जागच्या जागी ब्रेक मारल्यानं वेस्टर्न लाईनवर मोठा अनर्थ टळलाय. हा वाकलेला रेल्वे रुळाचे व्हिज्युअल आता समोर आले आहेत. (Virar Churchgate Railway Track) घटना घडल्यानंतर अनेक प्रवाशांनी गाडीतून उतरून पायी नालासोपारा स्थानक गाठलं. ट्रेनचा मोटरमन रुळावर लक्ष ठेवून होता आणि त्याला वाकलेला ट्रॅक दिसताच त्याने गाडी थांबवली. पुढील दुर्घटना होऊ नये म्हणून त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्वरित कळवले. त्यामुळे मोठा अपघात टळला आहे. परंतू ट्रॅक नक्की कशामुळे वाकला? याचे नेमके कारण स्पष्ट होऊ न शकल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय. ( Mumbai News)
नक्की झालं काय?
मंगळवारी दुपारी 12.45 ला विरारहून सुटलेली एसी लोकल विरार-नालासोपारा स्थानकादरम्यान आली असता मोटरमनच्या लक्षात वाकलेला रेल्वे रुळ आला. त्याने तत्काळ लोकल थांबवून वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. त्यानंतर मागून येणाऱ्या जनरल लोकललाही थांबवण्यात आले. दोन्ही लोकल थांबल्याने अनेक प्रवाशांनी गाडीतून उतरून पायी नालासोपारा स्थानक गाठले. रेल्वे प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करत फास्ट ट्रॅकवरील वाहतूक स्लो ट्रॅकवर वळवली. रेल्वे कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर काम करून वाकलेला रुळ पूर्णपणे बदलला, त्यानंतर फास्ट लाईनवरील वाहतूक सुरळीत करण्यात आली. रेल्वे प्रशासनाने याबाबत स्पष्टीकरण देताना सांगितले की, ट्रॅक वाकण्याचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.
मोटरमनच्या प्रसंगावधानचं कौतूक
या घटनामुळे प्रवाशांना काही काळ गैरसोय सहन करावी लागली. मात्र, मोटरमनच्या सतर्कतेमुळे सर्व प्रवासी सुखरूप राहिले. त्याच्या वेगवान निर्णयामुळे मोठा अनर्थ टळला. प्रवाशांनी मोटरमनचे आभार मानले असून, त्यांच्या सतर्कतेची प्रशंसा केली आहे. रेल्वे प्रशासनाने या घटनेची दखल घेतली असून, ट्रॅक वाकण्याचे कारण शोधण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले. भविष्यात अशा घटना होऊ नयेत यासाठी रेल्वे ट्रॅकच्या देखभालीवर अधिक भर दिला जाईल, असेही त्यांनी नमूद केले. मोटरमनच्या निर्णयामुळे एका मोठ्या दुर्घटनेची टांगती तलवार टळली आहे. रेल्वे प्रवाशांनी प्रशासनाकडून अधिक मजबूत सुरक्षा उपाययोजना करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.