(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Amarnat Yatra | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाची अमरनाथ यात्रा रद्द
कोरोनाची स्थिती पाहून बोर्डाने यात्रा रद्द करण्याबाबत निर्णय घेतला आहे. यात्रा रद्द करण्यात आली असली तरी भाविकांसाठी बोर्डानं सकाळच्या आणि संध्याकाळच्या आरतीचं थेट प्रक्षेपण होणार आहे.
नवी दिल्ली : कोरोनाचा प्रसार देशामध्ये वेगाने होत आहे. यामुळे यावर्षीची ऐतिहासिक अमरनाथ यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात अमरनाथ बोर्डाची बैठक झाली. या बैठकीत यात्रा रद्द करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. 21 जुलैपासून ही यात्रा सुरू होणार होती. मात्र कोरोनाची स्थिती पाहून बोर्डाने यात्रा रद्द करण्याबाबत निर्णय घेतला आहे.
एप्रिल महिन्यात देखील अमरनाथ यात्रा रद्द करण्यात आली होती. अमरनाथ यात्रा काश्मीर खोऱ्यातून ज्या मार्गावरून जाते त्या मार्गावर करोनाचे 77 रेड झोन आहेत. यामुळे लंगर उभारणं, वैद्यकीय सुविधा, छावण्या, सामानाची वाहतूक आणि रस्त्यावर पडलेला बर्फ हटवणं शक्य होणार नाही. म्हणून यंदाची अमरनाथ यात्रा रद्द करावी, असा निर्णय एप्रिल महिन्यामध्ये झाला होता. जगाच्या कानाकोपऱ्यातून भाविक दर्शनासाठी येत असतात.
Based upon the circumstances, Shri Amarnathji Shrine Board decided that it is not advisable to hold and conduct this year’s Shri Amarnathji Yatra and expressed its regret to announce the cancellation of Yatra 2020: Raj Bhavan, Government of Jammu & Kashmir pic.twitter.com/cSX95tcjaQ
— ANI (@ANI) July 21, 2020
यावर्षी यात्रा रद्द करण्यात आली असली तरी भाविकांसाठी बोर्डानं सकाळच्या आणि संध्याकाळच्या आरतीचं थेट प्रक्षेपण देण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, यात्रा पार पडणार नसली तरी प्रथेप्रमाणे या ठिकाणी पारंपारिक विधी पाडले जाणार असल्याचं जम्मू काश्मीरच्या प्रशासनानं स्पष्ट केलं आहे.
अमरनाथ यात्रेचं महत्त्व
हिंदू भाविकांच्या पवित्र स्थानांपैकी एक म्हणजे अमरनाथ होय. जम्मू काश्मीरमधील अनंतनाग परिसरातील बालाटल क्षेत्रात अमरनाथ गुहा आहे. या गुहेत बर्फाचं शिवलिंग असतं आणि ते थंडीच्या वातावरणातच आकार घेतं. आषाढ पौर्णिमा ते रक्षाबंधन-नारळी पौर्णिमेपर्यंत हे शिवलिंग पूर्ण आकार घेतं. त्यामुळे या काळात शिवलिंगाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होते.
अमरनाथ गुहेची अख्यायिका
भगवान शंकराने याच गुहेत आपलं अस्तित्व आणि अमरत्वाबाबतचं रहस्य पार्वतीला सांगितल्याची अख्यायिका आहे. या गुहेचा उल्लेख काश्मीरी इतिहासकार कल्हण यांनी 12व्या शतकात रचलेलं महाकाव्य 'राजतरंगिणी'तमध्येही आहे.
या गुहेच्या छतातून थेंब थेंब पाणी गळतं तेच पाणी गोठून एक विशालकाय रुप धारण करतं. याचा आकार शिवलिंगाप्रमाणे असतो, त्यामुळे हिंदू भाविक दरवर्षी इथे दर्शनासाठी येतात.
संबंधित बातम्या :