(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mohammed Zubair : Alt News च्या मोहम्मद जुबेर यांचा जामीन नाकारला, 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
Alt News co founder Mohd Zubair: एका ट्वीटच्या माध्यमातून हिंदू देवतांचा अवमान केल्याप्रकरणी मोहम्मद जुबेर यांच्यावर दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
Mohammed Zubair: Alt News चे सहसंस्थापक आणि पत्रकार मोहम्मद जुबेर यांचा जामीन दिल्लीतील पातियाळा हाऊस न्यायालयाने नाकारला असून त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दिल्ली पोलिसांनी धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी त्यांना अटक केली होती. त्यांच्यावर आयपीसी कलम 153/295 अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
मोहम्मद जुबेर यांना आज न्यायालयासमोर हजर करण्यात आलं होतं. एक ट्वीटच्या माध्यमातून हिंदू देवतांचा अवमान केल्याप्रकरणी त्यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. मोहम्मद जुबेर यांचे हे वादग्रस्त ट्वीट 2018 सालचे असल्याची माहिती आहे.
Delhi's Patiala House Court rejects the bail plea of Alt News co-founder Mohd Zubair, grants 14-day Judicial Custody pic.twitter.com/qnJtvBmvwP
— ANI (@ANI) July 2, 2022
मोहम्मद जुबेर यांना दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या IFSC युनिटने अटक केली आहे. जुबेर यांच्याविरुद्ध आयपीसी कलम 153/295 अ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहम्मद जुबेर यांनी एका विशिष्ट धार्मिक समुदायाविरुद्ध पोस्ट केलेले फोटो आणि शब्द हे अत्यंत प्रक्षोभक असून लोकांमध्ये द्वेष पसरवण्यासाठी हेतुपुरस्सर आहेत. यामुळे सार्वजनिक शांतता राखणे कठीण होऊ शकते. या पोस्टच्या आधारे वरील गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली.
याबाबत बोलताना Alt News सह-संस्थापक प्रतीक सिन्हा यांनी सांगितले की, मोहम्मद जुबेर यांना 2020 मध्ये एका वेगळ्या प्रकरणात चौकशीसाठी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने बोलावले होते. या प्रकरणात त्यांना उच्च न्यायालयाचे संरक्षण मिळाले आहे. तथापि, त्यांच्यावर आता या दुसऱ्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहम्मद जुबेर यांना या प्रकरणी कोणतीही सूचना देण्यात आली नाही. ज्या कलमांमध्ये त्यांना अटक करण्यात आली आहे, त्या कलमांमध्ये नोटीस देण्याची तरतूद आहे. मात्र तसे करण्यात आलेले नाही. अनेक वेळा विनंती करूनही आम्हाला एफआयआरची प्रत देण्यात आली नाही.