भारतातून ब्रिटनला जाणारी सर्व उड्डाणं 24 ते 30 एप्रिलपर्यंत रद्द, ब्रिटनच्या निर्बंधानंतर एअर इंडियाचं पाऊल
भारतातील कोरोनाची (Corona) वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता ब्रिटनने (Britain) भारताची 'रेड लिस्ट' मध्ये नोंद करून भारतातून .येणाऱ्या प्रवाशांवर निर्बंध लावले होते. त्याला आता एयर इंडियाच्या (Air India) वतीनं प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.
नवी दिल्ली : भारतातील वाढती कोरोनाची रुग्णसंख्या लक्षात घेता ब्रिटनने भारताला 'रेड लिस्ट'मध्ये टाकलं होतं. त्यामुळे भारतातून ब्रिटनला प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर निर्बंध लावण्यात आले होते. आता त्याला एयर इंडियाने चोख प्रत्युत्तर दिलं असून ब्रिटनकडे जाणारी सर्व उड्डाणं 24 ते 30 एप्रिलपर्यंत रद्द करण्यात आली आहेत. ही माहिती एयर इंडियाच्या वतीने देण्यात आली आहे.
एयर इंडियाने सांगितलं की, जे प्रवासी भारतातून ब्रिटनला जाणार होते त्यांना आता कोरोनाच्या निर्बंधामुळे प्रवास करता येणार नाही. कारण ब्रिटनकडे जाणारी सर्व उड्डाणं 24 एप्रिल ते 30 एप्रिल या दरम्यान रद्द करण्यात आली आहेत. तिकीटाच्या रिफंडबद्दल माहिती नंतर देण्यात येईल.
ब्रिटनने भारताला 'रेड लिस्ट' मध्ये टाकलं
भारतातील कोरोनाचं संकट पाहता ब्रिटनकडून भारताची नोंद रेड लिस्टमध्ये करण्यात आली आहे. सदर यादीत नोंद झाल्यामुळं आता भारतीय आणि आयरिश नागरिकांना भारतातून ब्रिटनमध्ये जाण्यावर निर्बंध असतील. यासोबतच परदेशातून परतलेल्या ब्रिटनच्या नागरिकांनाही इथं एका हॉटेलमध्ये 10 दिवसांसाठी विलगीकरणात रहावं लागणार आहे. ब्रिटनमध्ये भारतात आढळलेल्या संसर्गाच्या प्रकारचे 103 रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी अधिक रुग्ण हे परदेशातून परतलेले आहेत. समोर आलेल्या रुग्णसंख्येच्या विश्लेषणानंतरच भारताचं नाव रेड लिस्टमध्ये समाविष्ट करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला. त्यामुळं आता भारतीयांच्या ब्रिटन प्रवेशावर निर्बंध आले आहेत.
पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा भारत दौरा रद्द
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा पुढील आठवड्यातील नियोजित भारत दौराही रद्द करण्यात आल्याची घोषणा केली. हा दौरा 26 एप्रिलला नियोजित होता. या दौऱ्यादरम्यान अनेक महत्वाच्या गोष्टींवर चर्चा होणार होती. आता दोन देशांदरम्यान व्हर्च्युअल मीटिंगचे आयोजन करण्यात येणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
- MSD Parents Corona Positive : महेंद्रसिंह धोनीच्या आई-वडिलांना कोरोनाची लागण, रांचीमधील खाजगी रुग्णालयात दाखल
- Corona Vaccination | लसीकरणाच्या बाबतीत 'एक देश, एक किंमत' का नाही? काँग्रेसचा मोदी सरकारला सवाल
- माध्यम स्वातंत्र्याबद्दल भारताची स्थिती 'वाईट'; World Press Freedom Index च्या अहवालात मोदी सरकारवर ताशेरे