अहमदाबाद विमानाचा व्हिडिओ शूट करणारा आर्यन पोलिसांच्या ताब्यात; घराबाहेर माध्यम प्रतिनिधींच्या रांगा
अहमदाबादमधील एअर इंडियाच्या विमान दुर्घटनेचा थरारक प्रसंग एका व्हिडिओच्या माध्यमातून घराघरात आणि प्रत्येकापर्यंत पोहोचला.

अहमदाबाद विमान दुर्घटनेनं (Ahmedabad plane crash) देशभरात शोककळा पसरली होती. अवघ्या काही मिनिटांत होत्याचं नव्हतं करणारा हा अपघात पाहून अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला. तर, विमान अपघातातील मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश बघून कित्येकांचे डोळे पाणावले. या विमान दुर्घटनेत 241 प्रवाशांसह एकूण 275 नागरिकांचा मृत्यू झाला असून सध्या विमान अपघाताचा तपास करण्यात येत आहे. एअर इंडियांचे (air India) बोईंग 171 हे प्रवासी विमान 12 जून रोजी दुपारी 1.38 वाजता कोसळल्याची दुर्घटना घडली. त्यानंतर, काही वेळातच विमान दुर्घटनेचा व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर व्हायरल झाला. विशेष म्हणजे कधीही जवळून विमान न पाहणाऱ्या एका गावातील मुलाने हा व्हिडिओ उत्सुकतेपोटी शूट केला होता. मात्र, नेमकं विमानाचे उड्डाण शूट करताना हा भीषण अपघात घडला. आता, पोलिसांनी व्हिडिओ शूट करणाऱ्या आर्यनला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे.
अहमदाबादमधील एअर इंडियाच्या विमान दुर्घटनेचा थरारक प्रसंग एका व्हिडिओच्या माध्यमातून घराघरात आणि प्रत्येकापर्यंत पोहोचला. अपघातग्रस्त एआय 171 या विमानाने उड्डाण केल्यावरचा अवघा काही सेकंदाचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओत उड्डाणानंतर विमान खाली कोसळताना दिसून येते. या व्हिडीओमुळेच जगभरात काही क्षणात दुर्घटनेची माहिती मिळाली, त्यानंतर अनेक तर्कवितर्क लावण्यात आले. मात्र, हा व्हिडीओ आर्यन नावाच्या मुलाने काढला. एबीपी माझाने आर्यनसोबत संवाद साधला. त्यावेळी त्याने नेमकं काय घडलं?, याबाबत माहितीही दिली होती. आता, एकीकडे आर्यनच्या घराबाहेर माध्यम प्रतिनिधींनी बाईटसाठी रांगा लावल्यानेही आर्यन त्रस्त झाला आहे. दुसरीकडे आर्यनची पोलिसांकडून चौकशी केली जात आहे. आर्यन असारीला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं असून अहमदाबाद गुन्हे शाखेकडून त्याची चौकशी केली जात आहे. आर्यनसह ज्या घरावरुन त्याने हा व्हिडिओ शूट केला, त्या घरमालकासही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. "आर्यन हा त्याच्या वडिलांसोबत साक्षीदार म्हणून जबाब देण्यासाठी आला होता. त्यानंतर त्याला त्याच्या वडिलांसोबत पाठवण्यात आले. याप्रकरणी, अद्याप कोणालाही अटक किंवा ताब्यात घेण्यात आलेले नाही," अशी माहितीही पोलिसांनी दिली.
व्हिडिओबाबत काय म्हणाला आर्यन
विमान अपघाताचा व्हिडिओ काढणाऱ्याने आर्यन म्हटले की, मी गावात राहतो, अहमदाबादमध्ये राहत नाही. मी कधी विमान बघितले नव्हते. सध्या मी अहमदाबादमध्ये आलो होतो. यावेळी इमारतीच्या टेरेसवर आल्यानंतर विमान उडताना पाहिले. त्यामुळे मी माझ्या मोबाईलमध्ये व्हिडिओ काढण्यास सुरुवात केली. परंतु, थोड्याच वेळात या विमानाचा स्फोट झाल्याने मी घाबरून गेलो. हे नेमकं काय झालंय?, हे मला समजलं नाही, असं आर्यनने एबीपी माझाशी बोलताना सांगितलं होतं.
ब्लॅक बॉक्स अन् डीव्हीडीआर ताब्यात
दरम्यान, अहमदाबाद एअर इंडिया विमान अपघाताचा सहापेक्षा अधिक यंत्रणांकडून तपास सुरु आहे. डीजीसीए, एनएसजी, एनआयए, गुजरात एटीएसकडून कारणांचा तपास सुरु करण्यात आला आहे. तसेच सदर विमान दुर्घटनेबाबत एनआयएने घातपाताची शक्यता फेटाळली आहे. ब्लॅक बॉक्स आणि डीव्हीडीआर डेटाचं फॉरेन्सिक विभागाकडून विश्लेषण केलं जात आहे.
























