Army Agniveer : अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीची पासिंग आऊट परेड, एकूण 756 अग्निवीरांनी घेतली शपथ
Agniveers : अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीची पासिंग आऊट परेडमध्ये एकूण 756 अग्निवीरांनी भाग घेतला. यावेळी शीख रेजिमेंटच्या अग्निवीरांनी पंजाबी भाषेत देशभक्तीपर गाणी गायली.
Army Agniveer : अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीची पासिंग आऊट परेड शनिवारी, 5 ऑगस्ट रोजी जाट रेजिमेंटल सेंटर बरेलीच्या बक्षी परेड मैदानावर पार पडली. शीख रेजिमेंटच्या अग्निवीरांनी झारखंडमधील रेजिमेंटल सेंटरमध्ये प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर पासिंग आऊट परेडचे आयोजन केले होते. 31 आठवड्यांच्या अथक परिश्रमानंतर अग्निवीरांनी आपल्या देशाचं रक्षण करण्याची शपथ घेतली आणि ते सैन्यात सामील झाले. अग्निवीरांच्या कुटुंबीयांनीही यावेळी विशेष सहभाग घेतला.
अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीची पासिंग आऊट परेड
पासिंग आऊट बॅच परेड दरम्यान मार्च करताना शीख रेजिमेंटच्या अग्निवीरांनी पंजाबीमध्ये 'तिरंगा सादी जान' गाणं गायलं. याशिवाय परेडदरम्यान मिरवणूक काढताना पासिंग आऊट बॅचने ‘चल जवाना दौर’ हे गाणंही गायलं. एएनआयने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये उत्तीर्ण झालेल्या अग्निवीरांनी एकसुरात मोर्चा मार्च करताना अनेक गाणी गायली. यामध्ये ‘चल जवाना दौर, देश नु तेरी लोरह, हर मैदान फतेह कर, मुश्किल दे विचार दात के खर, शीख रेजिमेंट दी शान, तिरंगा सादी जान’ यांचा समावेश आहे.
Passing out parade - Agniveers of Sikh Regiment at Ramgarh Cantt, Jharkhand. 🔥🔥 Jai Hind 🇮🇳#Agniveer pic.twitter.com/dZryUdmmW4
— Stranger (@amarDgreat) August 5, 2023
शीख रेजिमेंटचे कमांडंट ब्रिगेडियर काय म्हणाले?
मीडियाला संबोधित करताना, शीख रेजिमेंटल सेंटरचे कमांडंट ब्रिगेडियर शैलेश सती म्हणाले, "हे अग्निवीर भारतीय सैन्य आणि शीख रेजिमेंटचा गौरवशाली वारसा पुढे नेतील. त्यांना मिळालेले प्रशिक्षण त्यांना त्यांच्या संबंधित युनिट्समध्ये सामील झाल्यावर आणि देशाच्या सुरक्षेसाठी योगदान देताना त्यांना सर्व क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी सक्षम करेल", असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
एकूण 756 अग्निवीरांचा सहभाग
याआधी शुक्रवारी, अग्निपथ योजनेचा एक भाग असलेल्या अग्निवीरांची पासिंग आऊट परेड बेंगळुरूमधील एएससी सेंटर आणि कॉलेजमध्ये आयोजित करण्यात आली होती. देशभरात अग्निवीरांच्या पहिल्या पासिंग आऊट परेडमध्ये एकूण 756 अग्निवीरांनी भाग घेतला. झारखंड, बंगळरु, वाराणसी, रामगड येथे पासिंग आऊट परेड पार पडली. केंद्र सरकारने 14 जून 2022 रोजी मंजूर केलेली अग्निपथ योजनेअंतर्गत चार वर्षांच्या कालावधीसाठी सशस्त्र दलात कमिशन्ड अधिकार्यांच्या रँकपेक्षा कमी असलेल्या सैनिकांची भरती करण्याची योजना आहे. ही योजना सप्टेंबर 2022 मध्ये लागू करण्यात आली.
या योजनेद्वारे भरती झालेल्यांना "अग्निवीर" ही पदवी दिली जाईल. आवश्यकतेनुसार, अग्निवीरांना कायमस्वरूपी पदासाठी अर्ज करण्याची संधी मिळू शकते. चार वर्षांनंतर, अग्निवीर इतर क्षेत्रातील रोजगारासाठी "कुशल कार्यबल" म्हणून समाजात वावरतील.