(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Agnipath Scheme: प्रत्येक युवकाला भरतीआधी हिंसाचारात सहभागी नसल्याचं प्रमाणपत्र द्यावं लागणार, सेना दलाची घोषणा
अग्निवीर म्हणून जर सेवा द्यायची असेल तर त्यासाठी हिंसा आणि तोडफोडीमध्ये सहभाग नसल्याचं प्रमाणपत्रक द्यावं लागणार आहे. तशी घोषणा तीनही सेना दलाच्या संयुक्त पत्रकार परिषदेत करण्यात आली आहे.
नवी दिल्ली : केंद्र सरकारने जाहीर केलेली अग्निवीर भरती प्रक्रिया तातडीने सुरू होणार असून त्यासाठी प्रत्येक युवकाला भरतीआधी हिंसा, तोडफोडीत सहभागी नसल्याचे प्रमाणपत्र द्यावे लागणार असल्याची माहिती लष्कराच्या वतीनं देण्यात आली. पोलीस व्हेरिफिकेशन हे शंभर टक्के करावं लागणार, ते असल्याशिवाय अग्निवीरांना सेवा जॉईन करता येणार नाही. सेनेच्या तीनही सेना दलांच्या वतीनं आज संयुक्त पत्रकार परिषद झाली. त्यामध्ये बोलताना लेफ्टनंट जनरल अनिल पुरींनी ही माहिती दिली.
केंद्राने जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेच्या विरोधात देशभरातील अनेक ठिकाणी युवकांची निदर्शनं सुरू आहेत. बिहारमध्ये तर युवकांच्या आंदोलनाला हिंसक रुप प्राप्त झालं असून अनेक रेल्वेंना आग लावल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यानंतर केंद्र सरकारने या योजनेसाठी वयोमर्यादा आणखी दोन वर्षांनी वाढवली. तर संरक्षण मंत्रालय तसेच कोस्ट गार्डने या अग्निवीरांसाठी 10 टक्के जागा आरक्षित ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आज सेनेच्या तीनही दलांकडून आज संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली.
ही सुधारणा या आधीच होणं आवश्यक होतं, 1989 साली यावर काम सुरू झालं होतं असं लष्कराच्या वतीनं सांगण्यात आलं.
होश आणि जोश यांचं कॉम्बिनेशन हवं आहे
लष्कराने घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगण्यात आलं की, येत्या 2030 सालापर्यंत 50 टक्के लोकसख्या ही 25 वर्षांच्या आतील असेल. त्यामुळे लष्कराला जोश आणि होश यांचं कॉम्बिनेशन असलेल्या युवकांची गरज आहे.
अग्निवीरांना संरक्षण मंत्रालयाच्या नोकऱ्यांमध्ये 10 टक्के आरक्षण
शनिवारी झालेल्या बैठकीत अग्निवीरांना संरक्षण मंत्रालयाच्या नागरी नोकऱ्यांमध्ये 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोस्ट गार्ड आणि डिफेन्स पीएसयूमध्येही 10 टक्के कोटा दिला जाईल. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आवश्यक पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या अग्निवीरांसाठी संरक्षण मंत्रालयातील नोकऱ्यांच्या 10 टक्के जागा राखीव ठेवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. भारतीय तटरक्षक आणि संरक्षण नागरी पदे आणि सर्व 16 संरक्षण सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमध्ये 10 टक्के आरक्षण लागू केले जाईल, असेही संरक्षण मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. हे आरक्षण माजी सैनिकांसाठीच्या सध्याच्या आरक्षणाव्यतिरिक्त असणार आहे
अग्निपथ योजनेअंतर्गत, भारतीय वायुसेना 24 जूनपासून भरती मोहीम सुरु करणार आहे. त्यानंतर लवकरच भारतीय लष्कराकडून अधिसूचना जारी केली जाईल. लष्करातील भरती प्रक्रिया लवकरच सुरु होणार असून विद्यार्थ्यांनी त्यासाठी तयारी सुरु करावी, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. तरुणांच्या भवितव्याबद्दलची काळजी आणि संवेदनशीलतेबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो असे सिंह म्हणाले. सैन्यात भरतीची प्रक्रिया काही दिवसांत सुरु होणार आहे. त्यांनी आपले काम सुरु करावे. त्यासाठी तयारी सुरु करावी असे आवाहन राजनाथ सिंह यांनी केले. तरुणांचे भविष्य डोळ्यासमोर ठेवून पंतप्रधान मोदींच्या सूचनेनुसार सरकारने अग्निवीर भरतीची वयोमर्यादा यावेळी 21 वर्षावरुन 23 वर्षे केली आहे. यामुळे अनेक तरुण अग्निवीर योजनेसाठी पात्र होणार आहेत.