अफगाण दहशतवाद्यांची भारतात घुसखोरी! गुप्तचर यंत्रणांचा इशारा, लष्कर तळावर हल्ल्याची शक्यता
गुप्तचर संस्थेने सांगितले आहे की 18 सप्टेंबर 2021 रोजी उरी सेक्टरमधील एका पोस्टमधून पाच अफगाण दहशतवादी भारतात घुसले आहेत.
अफगाणिस्तानमध्ये तालिबानने ताबा मिळाल्यानंतर पहिल्यांदाच अफगाण दहशतवादी भारतात घुसल्याच्या बातम्या येत आहेत. गुप्तचर संस्थांनी अलर्ट जारी केला आहे. मोठा हल्ला होण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांचे लक्ष्य लष्करी छावण्या किंवा मोठ्या सरकारी संस्था असू शकतात.
गुप्तचर अहवालांनुसार, उरी सेक्टरमधील एका पोस्टवर सुरक्षा जाळी कापून अफगाण दहशतवाद्यांनी घुसखोरी केली होती. अफगाण दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करण्यात मदत करुन परतत असलेल्या पाकिस्तानी दहशतवाद्यांशी सुरक्षा दलांची चकमक झाली, ज्यात एक जवान जखमी झाला. दहशतवाद्यांकडून प्राणघातक शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत. गुप्तचर अहवालात हे स्पष्टपणे लिहिले आहे की 18 सप्टेंबर 2021 रोजी उरी सेक्टरमधील एका पोस्टमधून पाच अफगाण दहशतवादी भारतात घुसले आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लष्करातर्फे उरी सेक्टरमध्ये शोधमोहीम राबवली जात आहे. हे पाच दहशतवादी अफगाणिस्तानातून आले आहेत, त्यामुळे ते काश्मीरमधील लोकांमध्ये सहज मिसळू शकत नाहीत. सुरक्षा दले सतत त्यांचा शोध घेत आहेत. सर्व संशयास्पद ठिकाणी छापे टाकण्यात येत आहेत. याशिवाय जे त्यांना आश्रय देऊ शकतात त्यांचीही चौकशी केली जात आहे. लष्करी छावण्या किंवा मोठ्या सरकारी संस्थांमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे.