Adipurush :'रामायणाच्या मूळ भावनेला बदण्याची गरज नव्हती', आदिपुरुषवर रामानंद सागरांच्या रामयणातील रामाची प्रतिक्रिया
Adipurush : रामानंद सागरांच्या रामायणात रामाची भूमिका निभावणारे अभिनेते अरुण गोयल यांनी आदिपुरुष या चित्रपटावर प्रतिक्रिया दिली आहे. आदिपुरषमधील अनेक घटकांवर त्यांनी आक्षेप नोंदवला आहे.
Adipurush : ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुष (Adipurush) या चित्रपटावर रामानंद सागर यांच्या रामायणात रामाची भूमिका साकारणारे अरुण गोविल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एबीपी न्यूज सोबत संवाद साधताना अरुण गोविल यांनी म्हटलं की, 'रामायण ही आमच्यासाठी एक आस्था आहे, विश्वास आहे त्यामुळे त्याच्यासोबत कोणत्याही प्रकारचा बदल स्विकारला जाऊ शकत नाही.' सध्या आदिपुरुष या चित्रपटावरुन अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. समीक्षकांनी तर या चित्रपटाला अक्षरश: झोडपून काढल्याचं चित्र आहे. प्रभासने साकरलेल्या रामाच्या भूमिकेवरही प्रेक्षकांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. तर हनुमानाच्या भूमिकेवरही नेटकरी चांगलेच संतापले आहेत.
'कथेला आधुनिकतेच्या आणि पौराणिक कथेच्या चौकटीत विभागणे चुकीचे'
अरुण गोविल यांनी राम, सीता आणि हनुमानाच्या भूमिकेविषयी बोलताना म्हटलं की, 'आधुनिकतेच्या आणि पौराणिक कथेच्या चौकटीत या पात्रांची विभागणी करणे चुकीचे आहे. त्यांचे स्वरुप हे शाश्वत आहे आणि ते आधीच ठरलेले आहे, मग तेच रूप चित्रपटात दाखवायला काय हरकत होती?' 'रामायणाची कथा सादर करणे हा लोकांच्या श्रद्धेच्या विषय आहे, त्यामुळे ते लोकांच्या श्रद्धेच्या विषयाला धरुन कथा कशी सादर करु शकतील हा विचार निर्मात्यांनी करायला हवा होता.', असं देखील गोविल म्हणाले. तर या चित्रपटामध्ये ज्या प्रकारची भाषा वापरण्यात आली आहे, त्यावर देखील अरुण गोविल यांनी आक्षेप घेतला आहे. रामायणातील या भाषेला कोणत्याही प्रकारचे समर्थन करणार नसल्याचं म्हणत, रामायणाच्या मूळ संकल्पनेपासून दूर जाण्याची काय गरज होती असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. तर 'जर हा चित्रपट लहान मुलांसाठी तयार केला असेल तर लहान मुलांना विचारा की त्यांना हा चित्रपट आवडला आहे की नाही' असं देखील त्यांनी म्हटलं.
'मी अद्याप हा चित्रपट पाहिलेला नाही'
एबीपी सोबत बातचीत करताना गोविल यांनी हा खुलासा केला आहे की त्यांनी अजूनही हा चित्रपट पाहिलेला नाही. तसेच 'हॉलिवूडपासून प्रेरित असलेल्या कार्टून फिल्मप्रमाणे रामायण सादर करणे हे कोणत्याही प्रकारे पचनी पडणारे नाही', असं देखील त्यांनी म्हटलं. 'दरम्यान या चित्रपटाचा जेव्हा टीझर समोर आला तेव्हाच निर्मात्यांशी बोलून त्यांना माझे मत सांगितले होते' असं गोविल यांनी सांगितलं. कलाकारांविषयी बोलताना गोविल यांनी म्हटलं की, 'यामध्ये कलाकारांचा दोष नाही, त्यांनी जी भूमिका दिली ती त्यांनी निभावली. त्यांच्या भूमिका हे निर्माते ठरवतात.'
रामानंद सागरांच्या रामायणाने नव्वदीच्या दशकातील गाजवला होता. त्यामधील प्रत्येक भूमिका, पात्र अजूनही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत. त्यामुळे ओम राऊतच्या 'आदिपुरुष' या चित्रपटाकडून बऱ्याच अपेक्षा ठेवण्यात आल्या होत्या. मात्र त्या अपेक्षा फोल ठरल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. रामायण हा भारतीय संस्कृतीचा वारसा आहे आणि त्यामुळे यावर आधारित चित्रपटबद्दल जे बोलले जात आहे ते अत्यंत खेदजनक आहे. रामायणाचे मूळ स्वरूप अशा प्रकारे बदलण्याची गरज नव्हती असंही अरुण गोविल यांनी म्हटलं.