31 मार्च | ऐतिहासिक दिवस, बाबासाहेब आंबेडकर यांच्या भारतरत्नची 30 वर्षे!
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 31 मार्च 1990 रोजी मरणोत्तर भारतरत्न सन्मान करण्यात आला होता. भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे.
मुंबई : वर्षाच्या 365 दिवसांची इतिहासात विविध घटनांसाठी नोंद आहे. यामध्ये काही घटना चांगल्या आहेत तर काही वाईट. 31 मार्च हा दिवस अशाच अनेक महत्त्वाच्या घटनांचा साक्षीदार आहे. भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 31 मार्च 1990 रोजी मरणोत्तर भारतरत्न सन्मान करण्यात आला होता. भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. हा आंबेडकरांनी देश आणि समाजासाठी दिलेल्या योगदानाचा गौरव म्हणून त्यांचा भारतरत्नने सन्मान केला.
भिमराव रामजी आंबेडकर अर्थात बाबासाहेब आंबेडकर यांचा भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय सहभाग होताच, पण त्याचवेळी त्यांनी आयुष्यभर सामाजिक आणि जातीभेदाविरोधात कायमच लढा दिला. भारताच्या स्वातंत्र्यानंतर त्यांची भूमिका आणखीच महत्त्वाची ठरली, जेव्हा त्यांच्यावर देशाचं संविधान बनवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली.
महार जातीत जन्मलेल्या बाबासाहेबांनी लहानपणापासूनच भेदभावाचा सामना केला होता. त्यांना शाळेत कायमच बाजूला बसवलं जात असे. या गोष्टीची सल त्यांच्या मनात कायमच होती. त्यामुळेच त्यांनी समाजातील जातीभेद नष्ट करण्याची प्रतीज्ञा केली होती.
समाजातील जातीभेद हटवणं हेच उद्देश समोर ठेवून आंबेडकरांनी आपलं कार्य केलं. यासाठी त्यांनी शिक्षणालाच आपलं शस्त्र बनवलं. हुशार असलेले बाबासाहेब शाळेत कायमच अव्वल येत असत. 1912 मध्ये बॉम्बे विद्यापीठातू राज्यशास्त्रात पीएचडी केल्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण परदेशात घेतलं. आंबेडकराच्या परदेशातील शिक्षणाचा खर्च कोल्हापूरचे राजर्षी शाहू महाराज आणि बडोद्याचे राजे सयाजीराव गायकवाड यांनी उचलला होता. यानंतर बाबासाहेबांनी 1921 मध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून शिक्षण पूर्ण केलं.
शिक्षण पूर्ण केल्यानंतर इतर विद्यार्थ्यांप्रमाणे त्यांनीही नोकरी स्वीकारली. परंतु बालपणी घेतलेली प्रतीज्ञा त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. यानंतर त्यांनी नोकरी सोडून सामाजिक आंदोलनात उडी घेतली. त्यांनी 1936 मध्ये लेबर पक्षाची स्थापना केली. शिवाय दलित, शोषित आणि पीडितांचा आवाज बुलंद करण्यासाठी, त्यांच्यात जागरुकता निर्माण करण्यासाठी त्यांनी 1920 साली 'मूकनायक' या वृत्तपत्राचीही सुरुवात केली.
भारत 15 ऑगस्ट, 1947 रोजी स्वातंत्र्य झाल्यानंतर डॉ. आंबेडकर यांना त्यांच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर संविधान बनवण्याची जबाबदारी मिळाली. त्यांनी अशा संविधानाची निर्मिती केली जे समाजाच्या प्रत्येक वर्गाला, घटकाला समान वागणूक आणि अधिकार देतं. भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर ते देशाचे पहिले कायदा मंत्री बनले.
बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी आणि महत्त्वपूर्ण घटना 1956 मध्ये घडली. हजारो अनुयायींसोबत आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. त्याचवर्षी डॉ. आंबेडकर यांचं महापरिनिर्वाण झालं. त्यानंतर 34 वर्षांनी म्हणजेच 1990 मध्ये त्यांचा मरणोत्तर भारतरत्नने सन्मान करण्यात आला.
आपले भारतरत्न | डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्षाची गाथा | Bharat Ratna | Atul Gogavale