19 December In History : गोवा मुक्ति दिवस, फिफा वर्ल्डकपची ट्रॉफी चोरीला; आजच्या दिवशी इतिहासात काय घडलं...
On This Day In History: आजच्या दिवशी इतिहासात कोणकोणत्या महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या यांची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
On This Day In History: भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी बलिदान दिले आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या संग्रामातील राम प्रसाद बिस्मिल, रोशन सिंग आणि अश्फाकुल्लाह खान या क्रांतिकारकांना ब्रिटिश सरकारने आजच्याच दिवशी 1927 मध्ये फाशी दिली होती. काकोरी कटातील सहभागामुळं इंग्रजांनी या क्रांतिकारकांना फाशी दिली होती. १९ डिसेंबर हा दिवस भारताच्या इतिहासात आणखी एका मोठ्या घटनेसाठी नोंदवला आहे. गोव्यातून पोर्तुगीज सत्ता संपण्यासाठी 19 डिसेंबर 1961 हा दिवस उजाडावा लागला. भारतीय लष्करानं आजच्याच दिवशी गोव्यातून पोर्तुगीजांना पिटाळून लावलं होतं. पोर्तुगीजांचं 450 वर्षाची सत्ता भारतीय लष्करानं ३६ तासांत संपवली होती. त्यामुळे १९ डिसेंबर हा दिवस गोवा मुक्ति दिवस (Goa foundation day) म्हणून साजरा करण्यात येतो. आजच्या दिवशी इतिहासात कोणकोणत्या महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या यांची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तसंच, आजच्या दिवशी असणारे दिग्गजांचे जन्मदिवस आणि निधन झालेल्या महत्वपूर्ण व्यक्तींबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत.
गोवा मुक्ति दिवस (Goa Liberation Day) -
15 ऑगस्ट 1947 रोजा भारताला स्वतंत्र्य मिळाले. पण त्यानंतरही महाराष्ट्राशेजारच्या गोव्यातील जनतेला मात्र 14 वर्ष वाट पाहावी लागली. कारण पोर्तुगीजांनी गोवन भूमी आपल्या मालकीची समजून तिथं आपला खुंटा बळकट करण्याचा डाव रचला आणि यानंतर गोवन जनतेचा संघर्ष सुरु झाला. हा संघर्ष तोही थोडक्या कालावधीसाठी नाही तर तब्बल 14 वर्ष चालला होता. अखेर 19 डिसेंबर 1961 ला गोवा स्वतंत्र झाला. पोर्तुगीजांनी गोव्यावर 450 वर्षे राज्य केले. भारताच्या स्वातंत्र्याच्या 14 वर्षानंतर भारतीय जवानांनी कारवाई करत अवघ्या 36 तासांत गोवा मुक्त केला. 19 डिसेंबर 1961 रोजी गोव्याला स्वातंत्र्य मिळाले. त्यानंतर 30 मे 1987 रोजी गोव्याला राज्याचा दर्जा देण्यात आला आणि अशा प्रकारे गोवा हे भारतीय प्रजासत्ताकचे 25 वे राज्य बनले. त्यामुळे दरवर्षी 19 डिसेंबर रोजी गोवा मुक्ती दिन साजरा केला जातो.
राम प्रसाद बिस्मिल यांच्यासह तिघांना फाशी (Ram Prasad Bismil) -
भारतीय स्वातंत्र्याच्या संग्रामातील राम प्रसाद बिस्मिल, रोशन सिंग आणि अश्फाकुल्लाह खान या क्रांतिकारकांना ब्रिटिश सरकारने आजच्याच दिवशी 1927 मध्ये फाशी दिली होती. काकोरी कटातील सहभागामुळं राम प्रसाद बिस्मिल आणि अश्फाकुल्लाह खान आणि रोशन सिंह यांना इंग्रजांनी आजच्याच दिवशी फाशी दिली होती. क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वात क्रांतिकारी पार्टीसाठी पैसा जमा करण्यासठी लखनौ जवळच्या काकोरी येथे सर्व क्रांतिकारक जमा झाले. 9 ऑगस्ट 1925 च्या रात्री काकोरी आणि आलमनगर रेल्वे स्थानकादरम्यान सहारनपूर लखनौ एक्स्प्रेसमधील इंग्रजांचा सोने- चांदीचा खजिना लुटण्यात आला. अवघे दहा पंधरा क्रांतिकारक विरुद्ध इंग्रज असा सामना झाला होता. या काकोरी कटात सहभागी असल्यामुळे तीम क्रांतिकारकांना फाशी देण्यात आली होती.
प्रतिभाताई पाटील यांचा जन्म (Pratibha Patil Former President of India) -
भारताच्या बाराव्या आणि पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचा आजच्याच दिवशी 1934 मध्ये जन्म झाला होता. प्रतिभाताई देवीसिह पाटील (शेखावत) असं त्यांचं पूर्ण नाव. खानदेशातील जळगाव जिल्ह्यात त्यांचा जन्म झाला होता. १९६२ साली त्या जळगाव विधानसभा मतदार संघातून विधानसभेवर निवडून आल्या. त्यांनी सतत वीस वर्षे निरनिराळ्या खात्याच्या मंत्री म्हणून काम पाहिले. त्यांनी राज्यमंत्रिमंडळात आरोग्य, पर्यटन, संसदीय कार्य, गृहनिर्माण, समाजकल्याण व सांस्कृतिक, सार्वजनिक आरोग्य व समाजकल्याण, दारूबंदी व पुनर्वसन, शिक्षणमंत्री अशा विविध खात्यांचे काम पाहिले. १९८५ साली राज्यसभेवर निवडून गेल्या व राज्यसभेच्या उपाध्यक्षा म्हणून निवडून आल्या. तो त्यांचा कार्यकाल संपल्यावर अमरावतीहून १९९१ साली प्रथमच त्या लोकसभा सदस्य म्हणून निवडून आल्या. त्यानंतर राजस्थानच्या राज्यपाल म्हणून देखील त्यांनी काम पाहिले. पुढे 25 जुलै 2007 ते 24 जुलै 2012 या काळात त्यांनी देशाचे राष्ट्रपतीपद भूषवले. त्या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती ठरल्या होत्या.
व्ही.एन. खरे भारताचे सरन्यायाधीश - (V. N. Khare, Former Chief Justice of India )
व्ही.एन. खरे यांनी आजच्याच दिवशी भारताचे ३३ वे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला. 19 डिसेंबर 2002 ते 1 मे 2004 या कालावधीत खरे यांनी सर न्यायाधीश म्हणून काम पाहिलं. सरन्यायाधीश हे सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख असतात आणि खटल्यांचे वाटप आणि कायद्यातील महत्त्वाच्या बाबी हाताळणाऱ्या घटनात्मक खंडपीठांच्या नियुक्तीची जबाबदारी त्यांच्यावर असते. भारताचे राष्ट्रपती भारताच्या सरन्यायाधीशांची नेमणूक करतात आणि संसदेद्वारे महाभियोगाच्या प्रक्रियेद्वारेच त्यांना हटवले जाऊ शकते.
पद्मभूषण कस्तुरभाई लालभाई यांचा जन्म ( Kasturbhai Lalbhai Indian industrialist ) -
आजच्याच दिवशी १८९४ मध्ये कस्तुरभाई लालभाई यांचा जन्म झाला होता. दानशूर व राष्ट्रवादी विचारसरणीचे उद्योगपती म्हणून त्यांना ओळखलं जात होतं. त्यांना पद्मभूषण (१९६९) पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे संचालक (१९३७ – १९४९) म्हणूनही त्यांनी काम पाहिलं आहे.. अरविंद मिल्स, अशोक मिल्स, अतुल असे अनेक गिरण्या व कारखाने त्यांनी चालू केले होते. त्यांच्यामुळे अनेकांना रोजगार मिळाला. आपल्या गिरण्य़ांत त्यांनी कामगार कल्याणासाठी सहकार संस्था काढल्या होत्या. त्यांचा मृत्यू: २० जानेवारी १९८० रोजी झाला होता.
मार्टिन लूथर किंग सीनियर यांचा जन्म (martin luther king sr.) -
मार्टिन लूथर किंग सीनियर यांचा जन्म आजच्याच दिवशी १८९९ मध्ये झाला होता. मानवाधिकारांसाठी आजीवन संघर्ष करणाऱ्या मार्टिन लूथर किंग यांचा मृत्यू ११ नोव्हेंबर १९८४ रोजी झाला होता. अमेरिकेचे मुख्य धर्मोपदेशक म्हणूनही त्यांना ओळखलं जायचं. ते बैपटिस्ट चर्चमध्ये सदस्य होते.
रिकी पाँटिंगचा जन्मदिवस (Ricky Ponting Australian cricket coach)
ऑस्ट्रेलियाचा महान क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार रिकी पाँटिंगचा आज जन्मदिवस आहे. १९ डिसेंबर १९७४ रोजी रिकी पाँटिंगचा जन्म झाला होता. रिकी पाँटिंगनं १६८ कसोटी सामम्यात १३ हजार पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. ३७५ एकदिवसीय सामन्यात पाँटिंगने १३ हजार ७०० धावांचा पाऊस पाडलाय. पाँटिंगने १७ टी२० सामन्यात ऑस्ट्रेलियाचं प्रतिनिधित्व केलेय. पाँटिंगनं १७ टी२० मध्ये ४०० धावा केल्या आहेत. पाँटिंगच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाने अनेक अशक्यप्राय विजय मिळवले आहेत. पाँटिंग सध्या आयपीएलमध्ये दिल्ली संघाचा कोच म्हणून काम पाहतोय.
फिफा वर्ल्डकपची ट्रॉफी चोरीला (FIFA World Cup) -
सध्या कतारमध्ये फिफा विश्वचषकाचा थरार सुरु आहे. पण तुम्हाला माहितेय का? आजच्याच दिवशी १९८३ मध्ये फिफा वर्ल्डकपची ट्रॉफी चोरीला गेली होती. होय. ब्राझीलची राजधानी रिओ-डी-जनेरियो येथे ज्युल्स रिमे ट्रॉफी (त्यावेळी फिफा विश्वचषक ट्रॉफी याच नावाने ओळखली जात होती) चोरीला गेली. ब्राझिलियन फुटबॉल असोसिएशनच्या मुख्यालयात बुलेटप्रूफ काचेच्या शो केसमध्ये फिफाची ट्रॉफी ठेवण्यात आली होती. पण चोरट्यांनी शिताफीनं ट्रॉफी गायब केली. चोरीला गेलेली ट्रॉफी पुन्हा कधीच मिळाली नाही. याआधी १९६६ मध्ये ट्रॉफी चोरीला गेली होती. लंडनमधील वेस्टमिन्स्टर हॉलमध्ये ही ट्रॉफी प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली होती. तेथून ही ट्रॉफी चोरीला गेली होती.