Hingoli : हातात तलवार घेऊन 'शक्तिप्रदर्शन' करणं महागात पडलं, आमदार बांगर यांच्याविरोधात गुन्हा दाखल
Santosh Bangar : हिंगोलीत आयोजित करण्यात आलेल्या कावड यात्रेदरम्यान आमदार बांगर यांनी तलवार हातात घेऊन फिरवल्याचे समोर आले होते
हिंगोली : नेहमी आपल्या वादग्रस्त वक्तव्य आणि प्रकरणामुळे चर्चेत राहणारे शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. हातात नंगी तलवार घेऊन सार्वजनिक ठिकाणी फिरवल्याने आमदार बांगर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. हिंगोलीत आयोजित करण्यात आलेल्या कावड यात्रेदरम्यान आमदार बांगर यांनी ही तलवार हातात घेऊन फिरवल्याचे समोर आले होते.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeay) यांची हिंगोली जिल्ह्यात सभा झाल्यानंतर शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्या वतीने कावड यात्रा काढण्यात आली होती. या यात्रेतून आमदार बांगर यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. कळमनुरीच्या चिंचाळेश्वर महादेव मंदिराजवळ बांगर समर्थकांनी त्यांचा सत्कार केला. तसेच याचवेळी बांगर यांना तलवार भेट दिली. मात्र म्यानातून भेट मिळालेली तलवार आमदार बांगर यांनी बाहेर काढून हातात घेऊन नाचवली. या सर्व घटनेचा व्हिडीओ समोर आल्यावर आमदार बांगर यांच्याविरोधात कळमनुरी पोलीस ठाण्यामध्ये आर्मस ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोबतच बेकायदेशीररित्या डीजे वाजवल्याप्रकरणी डीजेच्या मालकावर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.