(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Turmeric : हिंगोलीत हळदीला तब्बल 19 हजार रुपयांचा दर, मागील 14 वर्षातील सर्वोच्च दर
Turmeric : हिंगोली (Hingoli) जिल्ह्यात हळदीला विक्रमी दर (Turmeric Price) मिळाला आहे.
Turmeric : हिंगोली (Hingoli) जिल्ह्यात हळदीला विक्रमी दर (Turmeric Price) मिळाला आहे. वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीची (Vasmat Agricultural Produce Market Committee) उपबाजार पेठ असलेल्या कुरुंदा येथील मोंढ्यात शनिवारी हळदीला तब्बल 19 हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला आहे. मागील 14 वर्षातील हा सर्वोच्च दर असल्याची माहिती देण्यात आली आहे. हळदीला चांगला दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे.
कुरुंदा येथील मोंढ्यात हळदीला तब्बल 19 हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे. याचा शेतकऱ्यांना चांगला फायदा मिळत आहे. या ठिकाणी चार हजार हळदीच्या कट्ट्याची आवक झाली होती. हा भाव म्हणजे मागील 14 वर्षातील सर्वोच्च भाव मानला जात आहे. कुरुंदा येथील शेतकरी सदाशिव गवळी यांनी त्यांच्याकडे असलेली 21 क्विंटल हळद विक्रीसाठी आणली होती. या हळदीला तब्बल 19 हजार रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे दर मिळाला आहे. याचप्रमाणे इतर जिल्ह्यात सुद्धा हळदीला चांगला भाव मिळत आहे. सुरुवातीला हळदीला सर्वसाधारण भाव मिळत होता. परंतू, आता मात्र चांगला भाव मिळत असल्यानं हळद उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
हिंगोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात हळद विक्री
राज्यात सांगलीनंतर सर्वात जास्त हळदीची विक्री (Sale of turmeric) ही हिंगोली (Hingoli) जिल्ह्यातील संत नामदेव मार्केट यार्डमध्ये (Sant Namdev Market Yard) होत असते. यावर्षी देखील मोठ्या प्रमाणात हळदीची विक्री हिंगोलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये होत असल्याचं चित्र दिसत आहे. हिंगोली येथील हळदीचे मार्केट जिल्हाभरासह विदर्भात देखील प्रसिद्ध आहे. येथील मार्केटमध्ये हळदीला दर देखील चांगला मिळतो. मागील काही दिवसापासून येथील मार्केटमध्ये हळदीची आवक मोठ्या प्रमाणावर झाली आहे. येथील मार्केट यार्डात लिलाव पध्दतीने हळदीची विक्री केली जाते. त्यामुळे हळद उत्पादक येथे हळद विक्रीसाठी आणतात. हळदीच्या दरात फारशी तेजी-मंदी होण्याची शक्यता नसून दर टिकून राहतील, असा अंदाज हळद उद्योगातील जाणकारांनी व्यक्त केला आहे. देशात हळद काढणी झाली आहे. सध्या देशातील हळदीच्या बाजारपेठेत हळदीची आवक वाढू लागली आहे.
देशात हळद उत्पादित करणारं महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकाचे राज्य
मसाला पीक म्हणून हळदीचं महत्व खूप जास्त आहे. देशात हळद उत्पादित करणारं महाराष्ट्र (Maharashtra Haldi farming) हे दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे. तर तेलंगाणामध्ये सर्वाधिक हळदीचं उत्पादन होतं. काही ठिकाणी हळद पिकावर करपा रोग देखील पडत असल्याचे दिसत आहे. यामुळं पिकाला मोठा फटका बसत आहे. राज्यात दरवर्षी सरासरी दीड लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर हळद पीक पेरा केला जातो, मात्र काही वेळेस बदलत्या वातावरणाचा हळद पिकाला मोठा फटका बसतो.
महत्त्वाच्या बातम्या: