(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nagpur : आज सायंकाळपर्यंत नागपुरसह विदर्भातील काही ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता, हवामान विभागाचा इशारा
आज सकाळपासून नागपूरात ढगाळ वातावरण आहे. सायंकाळपर्यंत नागपूर, अमरावती, भंडारा, गोंदियासह विदर्भातील काही ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
नागपूरः आज (शनिवारी) सायंकाळपर्यंत नागपूर, अमरावती, भंडारा, गोंदियासह विदर्भातील काही ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. गुरुवारी विदर्भातील बहुतेक भागात पावसाचे आगमन झाले आहे. नागपूर शहरातही काही ठिकाणी सरी बरसल्या. शुक्रवारीही दिवसभर आकाशात ढग दाटले होते. मात्र पावसाने हुलकावणी दिली.
जून महिन्यात सरासरी 168.8 मिमि पाऊस होतो, पण यावर्षी 17 जूनपर्यंत फक्त 6.5 मिमि पावसाचे नोंद झाल्याने चिंता व्यक्त होत आहे. हवामान विभागाने विदर्भात मान्सूनचे आगमन झाल्याची घोषणा केली आहे. मात्र अकोल्यात झालेला 95.3 मिमि पाऊस वगळता इतर ठिकाणी ढग शांत आहेत. गोंदिया 4.2 मिमि, ब्रम्हपुरी 1.4 मिमि, वर्धा 1मिमिसह किरकोळ पावसाची नोंद झाली. नागपुरात शुक्रवारी सकाळपर्यंत 0.8 अंश पाऊस नोंदविला गेला. पण दिवसभर शुकशुकाट राहिला. मागील वर्षी 9 जूनला पावसाचे आगमन झाले होते. पण यावर्षी 7 दिवस उशिरा पाऊस पोहोचला. नव्या मानकानुसार पावसाळा वेळेवर पोहोचल्याचे मानले जात आहे.
दोन वेळा जून 100 मिमि पेक्षा कमी
गेल्या दशकभरात दोन वेळा जून महिन्यात 100 मिमिपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. या वर्षी 17 जूनपर्यंत केवळ 6.5 मिमि पाऊस झाला आहे. त्यामुळे यावर्षी जून महिना कोरडा राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.नागपूरला जून 2014 साली 42.4 मिमि आणि 2019 साली 72.6 मिमि पावसाची नोंद झाली होती. 2012 मध्ये जून महिन्यात 126 मिमि पाऊस झाला. जो सरासरीपेक्षा कमी होता. बाकी वर्षात चांगला पाऊस झाला.
सूर्याची उघडझाप, आर्द्रता घटली
नागपूरात आजही सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. तसेच काही भागात मेघगर्जना सुरु आहे. शुक्रवारीही सकाळपासून आकाशात ढगांचे आवरण होते. सकाळी 8.30 वातजापर्यंत 84 टक्के आर्द्रता होती. मात्र दुपारी सूर्याची उघडझाप सुरु होती व सायंकाळपर्यंत आकाश निरभ्र झाले. त्यामुळे आर्द्रता घसरुन 50 टक्क्यांवर पोहोचली. तापमान 3 अंशाने वाढून 35.9 अंशावर पोहोचले होते.