एक्स्प्लोर
Advertisement
ग्रामदेवता: शिवकालीन परंपरा लाभलेले माढ्यातील माढेश्वरी मंदिर
सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्याचं दैवत म्हणजे माढेश्वरी. या मंदिराचे ऐतिहासिक महत्त्व म्हणजे, छत्रपती शिवाजी महाराजांचे मेहुणे रावराजी निंबाळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. तसेच या मंदिराची एक वेगळीच परंपरा आहे. बाराबलुतेदारांपैकी 8 बलुतेदारांना माढेश्वरी देवीच्या वाहनांचा मान देण्यात आला आहे. उत्सव काळात देवीची सर्व वाहने मंदिरात एकत्रित येतात, आणि त्यानंतर गावातून छबिना निघतो.
17 व्या शतकात शिवाजी महाराजांचे मेव्हणे रावराजी निंबाळकर यांनी मंदिराचा जीर्णोद्धार करुन आजचं भव्य मंदिर उभारलं. या जीर्णोद्धाराबद्दल जी कथा सांगितले जाते, तीही अतिशय रंजक आहे. कारण 1647 दरम्यान, माढा, मोहोळ, करमाळा परिसराचे जहागीरदार असलेल्या रावरंभाजी निंबाळकर यांच्यामागे मोघलांची फौज लागली होती. मोघलांपासून बचाव करताना त्यांनी माढा येथील पूर्वीच्या छोट्याशा माढेश्वरी देवीच्या मंदिराचा आसरा घेतला. यावेळी त्यांनी देवीला आपले प्राण वाचविण्याचे साकडे घातले. तसेच मोघलांपासून बचाव झाल्यास मोठं मंदिर उभारण्याचा नवस केला. यानंतर निंबाळकर वाचले आणि त्यांनी हे भव्य मंदिर उभारलं. तरीही हे मूळ मंदिर नेमक्या कोणत्या शतकातील असवं, याबाबत अद्याप कोणतीच नेमकी माहिती सांगता येत नाही.
मंदिरात प्रवेश करताच एक भव्य कामान लागते. या कमानीवर भव्य कळस मंदिराची भव्यता दर्शवितो. मंदिरात प्रवेश करताच डाव्या बाजूला 2 आणि उजव्या बाजूला 1 अशा एकूण तीन दीपमाळ आहेत. गाभाऱ्याच्या समोरच अलीकडच्या काळात बांधण्यात आलेला सभा मंडप तेथे होमकुंडही आहे. दसऱ्यादिवशी याच ठिकाणी होमहवन आणि इतर धार्मिक विधी संपन्न होतात.
संपूर्ण मंदिर हे सुबक आणि रेखीव दगडात बांधण्यात आले आहे. मंदिराच्या आता चारही बाजूला ओवऱ्या बांधण्यात आल्या असून दर्शनाला आलेले भाविक या ठिकाणी भोजन आणि विश्रांती घेतात. मंदिराच्या गाभाऱ्यात सिंहासनावर माढेश्वरी मातेची वालूकाश्मापासून बनवलेली मुख्य मूर्ती असून, त्याच्या शेजारीच उत्सव मूर्ती आहे. माढेश्वरी चतुर्भुज असून एका हातात ढाल, दुसऱ्या हातात शंख-चक्र, तिसऱ्या हातात महिषासुराचे मस्तक तर चौथ्या हातात त्रिशूल आहे. माढेश्वरी मातेच्या अलंकार पूजेमुळे मूर्तीचे मूळ रुप दिसून येत नाही.
माढेश्वरी हे पार्वतीचेच रुप मानलं जात असल्याने तिचे वाहन असलेल्या हत्तीला येथे यात्रा काळात मोठा मान असतो. हे अत्यंत जागृत देवस्थान असल्याने परिसरातील कोणताही विवाह सोहळ्याची पहिली भोगी देवीला केल्याशिवाय लग्नाच्या तयारीला सुरुवात होत नाही.
माढेश्वरीचा वर्षभरात फक्त एकाच उत्सव असतो. नवरात्रीच्या उपवासानंतर दसऱ्याला देवीची पालखी निघते. या पालखी सोहळ्यानंतर देवी निद्रेस जाते. कोजागिरी पौर्णिमेला मोठा उत्सव असतो याच दिवशी गावाची मोठी यात्रा भरते. या यात्रा काळात नोकरी व्यवसायानिमित्त बाहेर गेलेली सर्व कुटुंबे माढ्यात आवर्जुन येतात. या दिवशी रात्री 12 वाजता देवीचा छबिना निघतो. बलुतेदारांना देवीच्या 8 वाहनांचे वाटप करण्यात आले आहे. यामध्ये माने घराण्याला सिंह, काटे घराण्याला मोर, रणदिवे घराण्याला वाघ, जाधव घराण्याला गरुड, मरकड समाजाला नंदी आणि भांगे घराण्याला घोडा हे वाहन परंपरागत देण्यात आलं आहे. ही सर्व वाहने छबिना निघतो, त्या दिवशी मंदिरात एकत्रित होतात. त्या वाहनांवर देवीच्या मूर्ती बसवून वाजत-गाजत हा छबिन्यासमोर असलेल्या मातंगाई देवीच्या भेटीला जातो. या वाहनांमध्ये सर्वात शेवटी असतो हत्ती. मात्र हत्ती हलल्याशिवाय कोणतेच वाहन हलविण्यात येत नाही. हा हत्तीचा मान गावातील माळी समाजाला आहे. या प्रत्येक वाहनावर देवीच्या मूर्ती ठेवण्यात येतात. या सर्व मूर्ती गाभाऱ्याशेजारच्या एका खोलीत येतात. यात्रेच्या दिवशी सजवल्या जातात. वाहनांच्या पाठीमागे सर्व माढा पंचक्रोशीतील नागरिक चालत मातंगाई देवीच्या भेटीला जातात.
कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री 12 वाजता सुरु झालेला छबिना पहाटे 5 वाजेपर्यंत चालतो. या काळात मंदिर आणि परिसराला आकर्षक विद्युत रोषणाईने सजविण्यात येते. या वाहनांवरील देवींना गावकरी मनाप्रमाणे भोगी करतात. वर्षभर देवीच्या दर्शनासाठी हजारो भाविक माढ्यात येत असतात. या मंदिरात नंतरच्या काळात लोकवर्गणीमधून विविध कामे करण्यात आली.
या मंदिरात फार पूर्वीपासून चंद्रकांत विश्वनाथ पुजारी यांचेकडे एक सदस्यीय विश्वस्त पद असून त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी मंदिराचा कारभार पाहत आहेत. देवस्थानाला 20 एकर ईनाम जमीन असून यावर मंदिराचा खर्च चालविला जातो.
व्हि़डीओ पाहा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
Advertisement