Gondia News: शाळेच्या जीर्ण इमारतीच्या छताला पॉलिथीनचे पांघरुण, शाळा प्रशासनाला सलग तिसऱ्या वर्षी करावी लागणार कसरत
Gondia News: पाणी वर्गात जमा होत असून साचलेल्या पाण्यातच विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावे लागते. पावसाळ्यात गळती होत असल्याने संपूर्ण इमारतच धोकादायक बनली आहे.
गोंदिया : विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण घेता यावे याकरता पोषक वातावरण हवे असते. मात्र गोंदिया (Gondia News) जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील चिखली येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा जीर्ण अवस्थेत असल्याने विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यायला प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. आता लवकरच नवीन शैक्षणिक सत्राला सुरुवात होणार आहे.पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. शाळा इमारत पाडून नवीन वर्गखोल्या तयार करण्यासाठी पाठपुरावा करूनही नवीन बांधकाम झाले नाही. परिणामी यावर्षी शाळेच्या जीर्ण इमारतीवर पॉलिथीन पांघरुण जीव मुठीत घेऊन विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करावे लागणार आहे.
संपूर्ण इमारतच धोकादायक
सडक-अर्जुनी पंचायत समिती अंतर्गत ग्राम चिखली येथे जिल्हा परिषद केंद्र वरिष्ठ प्राथमिक शाळा असून शाळेत इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत वर्ग आहेत. शाळेत एकूण 12 वर्गखोल्या आहेत. यातील जवळपास आठ ते नऊ वर्गखोल्यांच्या स्लॅबमधून पावसाचे पाणी गळते. यामुळे पाणी वर्गात जमा होत असून साचलेल्या पाण्यातच विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावे लागते. पावसाळ्यात गळती होत असल्याने संपूर्ण इमारतच धोकादायक बनली आहे.
जागेअभावी जीर्ण इमारत पाडून नवीन बांधकाम करणे शक्य नाही
छताच्या दुरुस्तीवर मागील तीन-चार वर्षांत लाखोंचा निधी खर्च करण्यात आला. त्यानंतरही पाणी गळती सुरूच असून, लाखोंचा निधी पाण्यात गेला. शाळेसाठी दोन नवीन वर्गखोल्या मंजूर करण्यात आल्या. मात्र, जागेअभावी जीर्ण इमारत पाडून नवीन बांधकाम करणे शक्य नाही. पावसाच्या पाण्याने स्लॅब गळती थांबविण्यासाठी तात्पुरता उपाय म्हणून ग्रामपंचायतीला पॉलिथीन विकत घेऊन द्यावे लागते. कायमस्वरूपी उपाय म्हणून शाळेच्या इमारतीवर खर्च करावा, अशी मागणी पालक वर्गाकडून करण्यात आली आहे.
सतत पटसंख्येच्या आधारावर शिक्षकांची नियुक्ती करावी या मागणीला घेऊन शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुभाष मेश्राम यांनी पालकांसह 10 जूनला उपोषणाचा निर्णय घेतला होता. तसेच या संदर्भात लेखी पत्र जिल्हा परिषदेला देण्यात आले होते. त्या अनुषंगाने ग्रामपंचायत पदाधिकारी, पालक, शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांची शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनात बैठक झाली. त्यात येत्या 10 दिवसांत एक शिक्षक, सत्र सुरु झाल्यानंतर एक शिक्षक आणि एक स्वयंसेवक देण्याचे मान्य केले. बैठकीत पदाधिकाऱ्यांचे समाधान झाल्याने तूर्त उपोषणावर बसण्याचा निर्णय मागे घेण्यात आला.
हे ही वाचा :