Gondia: शाळेत शिकवायला शिक्षक हवे; मागणीसाठी भर उन्हात विद्यार्थ्यांचं उपोषण, पालकांचाही सहभाग
Gondia News: शिक्षकांच्या मागणीसाठी रखरखत्या उन्हात गोंदियातील विद्यार्थी उपोषणावर बसले आहेत. विद्यार्थ्यांच्या पालकांनीही या साखळी उपोषणात सहभाग घेतला आहे.
गोंदिया: गोंदिया (Gondia) जिल्ह्यातील तिरोडा तालुक्याअंतर्गत येत असलेल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा इंदोरा खुर्द येथील 110 विद्यार्थ्यांनी शाळेत शिकवायला शिक्षक हवे, या मागणीसाठी घेऊन तिरोडा तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषणाला सुरुवात केली. 110 विद्यार्थ्यांच्या मागे फक्त एकच शिक्षक असून एक मुख्याध्यापक शाळेत आहे. त्यामुळे संपूर्ण शाळेचा भार हा एकच शिक्षकावर येत असल्याने विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून पालकांनी या संदर्भात स्थानिक आमदार विजय रहांगडाले तसेच गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे मागणी केली. मात्र त्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्याने अखेर विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांनी 11 ऑक्टोबरपासून साखळी उपोषण सुरू केलं आहे. जोपर्यंत शाळेमध्ये शिक्षक येणार नाही, तोपर्यंत हे साखळी उपोषण सुरू राहणार, अशी भूमिका पालकांसह विद्यार्थ्यांनी घेतली आहे.
रखरखत्या उन्हात विद्यार्थ्यांसह पालकांचं साखळी उपोषण
महाराष्ट्र शासनाने शाळा दत्तक घेण्याचा जीआर काढल्यानंतर महाराष्ट्राच्या सर्व स्तरातून याचा विरोध करण्यात येत आहे. मात्र अशातच गोंदिया जिल्ह्यातील इंदोरा येथील विद्यार्थ्यांनी चक्क शिक्षकांच्या मागणीला घेऊन रखरखत्या उन्हामध्ये साखळी उपोषण सुरू केलं आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत फक्त दोनच शिक्षक आहेत. त्यापैकी एका शिक्षकाकडे मुख्याध्यापकाचा पदभार देण्यात आला आहे, त्यामुळे शिक्षकांवर देखील कामाचा भार वाढत आहे. यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे. या संदर्भात गेल्या अनेक दिवसांपासून गावकऱ्यांनी आणि विद्यार्थ्यांनी शिक्षक द्या, अशी मागणी केली होती. मात्र मागण्या पूर्ण न झाल्याने अखेर संतप्त झालेल्या पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी चक्क तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केलं आहे.
सीसीटीव्ही कॅमेरे लागलेल्या शाळेला वाईट दिवस
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा इंदोरा खुर्द ही शाळा एकीकडे डिजिटल शाळा म्हणून जिल्ह्यात प्रसिद्ध होती. संपूर्ण शाळेतील वर्ग खोल्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. इतकेच नव्हे तर, त्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा रिमोट हा पालकांना देखील देण्यात आला होता, जेणेकरुन तेथील पालक आपले विद्यार्थी शाळेत काय करतात? हे घर बसल्या बघू शकतील. मात्र आता याच डिजिटल शाळेवर वाईट दिवस आले असून चक्क विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या मागणीसाठी उपोषणावर बसावं लागलं आहे.
भाजप आमदार विजय रहांगडाले यांचा मतदार संघ
गोंदिया जिल्ह्यातील भाजपचे एकमेव आमदार विजय रहांगडाले यांचा हा मतदारसंघ असून पालकांनी यासंदर्भात आमदार विजय रहांगडाले यांच्याकडे शिक्षकांकरिता मागणी केलेली होती. मात्र, आमदार साहेब सत्तेत आहेत. तरीही आम्हाला शिक्षक मिळाला नाही, ही एक शोकांतिकाच आहे, अशी नाराजी पालकांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा: