Gadchiroli Naxal Encounter: पोलीस-नक्षल चकमकीत एक जहाल नक्षलवादी ठार; घटनास्थळावरून शस्त्रसाठा जप्त
Gadchiroli Naxal Encounter: गडचिरोलीमध्ये झालेल्या नक्षलवाद्याच्या विरोधातील चकमकीत एक जहाल नक्षली ठार झाला आहे. त्याच्यावर दोन लाख रुपयांचे बक्षीस होते.
Gadchiroli Naxal Encounter: गडचिरोलीमध्ये पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये (Police Naxal Encounter) मोठी चकमक झाली. चकमकीत एका नक्षलीला कंठस्नान घालण्यात सी-60च्या जवानांना यश आले आहे. भामरागड तालुक्यातील कियरकोटी-मुरूमभुशी-कोपरशी जंगलात चकमक झाली. नक्षलविरोधी अभियानादरम्यान नक्षलवाद्यांकडून मोठा घातपात करण्याचा कट आखला जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर गडचिरोली पोलीस अधिक सतर्क झाले होते. त्यानंतर झालेल्या चकमकीत एक जहाल नक्षली ठार झाला. या जहाल नक्षलीवर दोन लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.
तोडगट्टा येथील जनआंदोलनासाठी नक्षलवाद्यांनी नागरिकांना बळजबरी सहभागी होण्यास भाग पाडले आहे, असे नक्षलवाद्यांनी नुकत्याच टाकलेल्या पत्रकातून सिद्ध होत असल्याचे पोलिसांनी सांगितले. नागरिकांना आणखी फूस लावून आंदोलन कायम ठेवण्याच्या हेतूने तसेच पोलीसांद्वारे राबविण्यात येणाऱ्या नक्षलविरोधी अभियान दरम्यान मोठा घातपात करण्याची योजना नक्षलवाद्यांकडुन आखली जात आहे, अशा खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे गडचिरोली पोलीस दलाच्या विशेष अभियान पथकांच्या जवानांनी त्या भागात शोध अभियान राबविले.
या शोधमोहिमेदरम्यान सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास उपविभाग हेडरी अंतर्गत येणाऱ्या गट्टा (ज.) हद्दीतील हिक्केर जंगल परिसरातील पहाडीवर सुमारे 60 ते 70 नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरू केला. जवानांना जीवे ठार मारण्याच्या आणि त्यांच्याकडील हत्यार लुटण्याच्या उद्देशाने बीजीएल व इतर दारुगोळ्याच्या साह्याने तीव्र स्वरुपात अंदाधुंद गोळीबार केला. नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरू केल्यानंतर पोलीसांनी नक्षलवाद्यांना शरण येण्याचे आवाहन केले. मात्र, त्यानंतरही नक्षलवाद्यांनी शरण न येता पोलीसांवर आणखी जोरदार हल्ला चढवला. जवानांनी प्रत्युत्तरादाखल, स्वरक्षणासाठी नक्षलवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला. चकमक ही सुमारे 30 ते 45 मिनीटे सुरू होती. पोलिसांकडून सुरू असलेला तीव्र हल्ला पाहून नक्षलवाद्यांनी घनदाट जंगलाचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला.
मारल्या गेलेल्या नक्षलीची ओळख पटली
चकमकीनंतर जंगल परिसरात जवानांनी शोध अभियान राबविले. त्यावेळी घटनास्थळावर एका पुरुष नक्षलवाद्याचा मृतदेह आढळून आला. मृत नक्षलीची ओळख पटली असून त्याचे नाव समीर ऊर्फ साधु लिंगा मोहंदा, (वय 31) रा. तुमरकोडी, ता. भामरागड येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली. त्याच्यावर दोन चकमक आणि दोन इतर असे 4 गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये भामरागड येथे 2018 साली पोलिसांना जिवे मारण्यासाठी ॲम्बुश लावणे यासाठी देखील गुन्हा दाखल आहे. हा जहाल नक्षली सन 2014-15 साली चातगाव दलममध्ये सदस्य पदावर भरती झाला होता. त्यानंतर 2017 साली प्लाटून क्रमांक 7 मध्ये भास्करचा सुरक्षा गार्ड होता. तसेच सन 2018 साली कंपनी 4 मध्ये कार्यरत होता. त्याच्यावर महाराष्ट्र शासनाने दोन लाख रुपयाचे बक्षीस जाहीर केले होते.
चकमकीत च्या घटनास्थळी काय मिळाले
घटनास्थळावर एक देशी बनावटीची रायफल, एक भरमार रायफल, एक 303 रायफल, ब्लास्टींगचे साहित्य, एसएलआरच्या दोन मॅगझिन आणि 30 राउंड्स, 8 एमएम रायफलचे 3 राऊंड्स, 12 बोरचे 4 राऊंड्स, 2 पिट्टू, नक्षल लिखाण साहित्य, एक सॅमसंग कंपनीचा टॅब्लेट, रेडिओ, रोख रक्कम रुपये 38120, नक्षल कपडे, व इतर नक्षल साहित्य हस्तगत करण्यात आले. जंगल परिसरात सी-60 पथकाच्या जवानांचे नक्षलविरोधी अभियान आणखी सुरु असुन, जंगल परिसरात मोठ्या प्रमाणात शोध मोहिम राबविण्यात येत आहे.