(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Gadchiroli News: मार्कंडा देवस्थानच्या जिर्णोद्धारासाठी सरसावले नागरिक; आंदोलनातून कार्य पूर्ण करण्याची मागणी
Gadchiroli News: विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऐतिहासिक मार्कंडा देवस्थानाच्या जिर्णोद्धार करण्याच्या मागणीला घेऊन आज गडचिरोलीत भव्य मोर्चा काढण्यात आला.
Gadchiroli News गडचिरोली : विदर्भाची (Vidarbha) काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऐतिहासिक मार्कंडा देवस्थानच्या (Markanda Mahadev Temple) जिर्णोद्धार करण्याच्या मागणीला घेऊन आज गडचिरोलीत (Gadchiroli News) भव्य मोर्चा काढण्यात आला. गेली दहा वर्षे विविध कारणांसाठी पुरातत्व विभागाने या मंदिराच्या जीर्णोद्धार अडवला असल्याचा आरोप करत जिल्ह्यातील हिंदुत्वावादी संघटना आक्रमक झाल्याचे चित्र दिसून आले. हरणघाट येथील मुरलीधर स्वामी महाराज यांच्या पुढाकाराने आज इंदिरा गांधी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले. यावेळी निर्वाधिन असलेले मंदिराचे काम पुरातत्व खात्याने तत्काळ सुरू कारवे, अशी मागणी या आंदोलनातून करण्यात आली.
गेल्या दहा वर्षांपासून ररखडले जिर्णोद्धाराचे काम
गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात वैनगंगा नदीच्या किनारी विदर्भातील काशी म्हणविले जाणारे मार्कंडेश्वर मंदिर आहे. हजारो वर्षांपासून हे मंदिर ऊन- वारा- पाऊस आदींचा मारा सहन करत आजही भक्कमपणे उभे आहे. या मंदिरावर वीज पडून झालेली हानी लक्षात घेता या मंदिराचा जिर्णोद्धार करण्यासाठी दहा वर्षांपूर्वी कामाला प्रारंभ करण्यात आला होता. त्या अनुषंगाने काम देखील सुरू झाले. मात्र अल्पावधीतच पुरातत्व खात्याने हे काम अर्धवट सोडून दिले होते. त्यानंतर विविध कारणांसाठी या मंदिराचा जिर्णोद्धार अडवून ठेवला जात असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. ऐतिहासिक मार्कंडेश्वर मंदिरात संपूर्ण विदर्भासह देशातील कानाकोपऱ्यातून भाविक महादेवाचे दर्शन घेण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यात दाखल होत असतात. शिवाय विदर्भातील प्रति खजुराहो म्हणून देखील या मंदिराचा लौकिक आहे.
अन्यथा तीव्र आंदोलनाच इशारा
गेल्या अनेक वर्षांपासून या मंदिराच्या जिर्णोद्धाराचे काम अडकून आहे. स्थानिकांनी या विषयी संबंधित विभागाकडे वेळोवेळी पाठपुरावा देखील केला असल्याचे बोलले जात आहे. मात्र अद्याप त्यावर कुठल्याही ठोस उपाययोजना न केल्याने स्थानिक नागरिक आणि भविकांमध्ये रोष बघायला मिळत आहे. परिणामी, आज या विरोधात स्थानिक हिंदू संघटना संताप्त झाल्या असून जिल्ह्यातील हरणघाट येथील मुरलीधर स्वामी महाराज यांच्या पुढाकाराने भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. इंदिरा गांधी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत या धडक मोर्चात हजारोंच्या संख्येने नागरिक, महिला मंडळ आणि संत महंत सहभागी झाले. हा मोर्चा एक इशारा असून आगामी काळात अधिक तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा देखील यावेळी या आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला दिला आहे. याशिवाय मार्कंडेश्वर मंदिराच्या परिसरात आजपासून उपोषणाची देखील सुरुवात करण्यात आली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या