Koradi : फ्लाय अॅशमुळे अनेक भागात पाणीपुरवठा बंदच, पाच दिवसांपासून अनेक वस्त्या कोरड्या
कन्हान नदीमध्ये अजूनही फ्लॉय अॅश कायम असल्यानेअद्यापही सातपैकी चार पंप बंद आहेत. केवळ तीन पंप सुरु करण्यात आल्याने मनपाच्या अनेक झोनमध्ये पाणी पुरवठा बंद आहे.
नागपूरः नदीतील फ्लाय अॅशमुळे कन्हान जलशुद्धीकरण केंद्रातील सातपैकी चार पंप अजूनही बंद असल्याने पाच दिवसानंतरही काही भागात पाणीपुरवठा सुरू झाला नाही. परिणामी संततधार पावसातही अनेक भागातील नारिकांना पाण्यासाठी मनस्ताप सहन करावा लागत आहे. नळांना पाणी कधी येणार, असा प्रश्न पाणीपुरवठा सुरू न झालेल्या वस्त्यांतील नागरिकांना पडला आहे.
कन्हान नदीमध्ये 15 जुलै रोजी खापरखेडा औष्णिक केंद्राची फ्लाय अॅश पुन्हा आढळून आल्याने कन्हान जलशुद्धीकरण केंद्रातील सातही पंप बंद करण्यात आले होते. नागपूर महानगरपालिकेच्या आशीनगर, नेहरुनगर, सतरंजीपुरा, लकडगंज झोनमधील 28 जलकुंभांतर्गत वस्त्यांमध्ये पाणीपुरवठा बंद होता. यातील काही वस्त्यांमध्ये दोन दिवसांपासून पाणीपुरवठा सुरू झाला. परंतु उत्तर नागपुरातील बुद्धनगर, मॉडेल टाऊन व इतर भागांमध्ये अद्यापही पाणीपुरवठा बंद आहे. कन्हान नदीमध्ये अजूनही फ्लॉय अॅश कायम असल्याचे सूत्राने नमुद केले. त्यामुळे अद्यापही सातपैकी चार पंप बंद आहेत. केवळ तीन पंप सुरु करण्यात आल्याने काही भागातील नागरिकांना दिलासा मिळाला. सद्यस्थितीत कन्हान नदीतून 165 ते 170 एमएलडी पाणीपुरवठा होत आहे. अर्थात 28 जलकुंभांतर्गत वस्त्यांपैकी 70 टक्के भागात नळ सुरू झाले. परंतु 30 टक्के परिसर अद्यापही नळातून पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत.
दोन दिवसांत नियमित पाणीपुरवठा
बुधवारी नागपूरात पावसाने उसंत दिली आहे. तसेच हवामान खात्याच्या अहवालानुसार उद्याही अशीच स्थिती कायम राहणार असल्याचा अंदाज आहे. प्लाय अॅशचा प्रभाव कमी होईल. त्यानंतर बंद असलेले चारही पंप सुरू करणे शक्य होणार आहे. दोन दिवसांत नियमित पाणीपुरवठा होईल, असे एका अधिकाऱ्याने नमुद केले.
राख बंधाऱ्याचा अहवाल सादर
कोराडी औष्णिक वीज प्रकल्प केंद्रालगतचा खसाळा राख बंधारा फुटल्याची कारणमीमांसा करणारा अहवाल कोराडीचे मुख्य अभियंता राजेश कराडे यांनी आज जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केला. यावर आता प्रशासन काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.