Sanjay Raut : "ते मुख्यमंत्री जरूर, मात्र माझ्या वक्तव्यावर बोलण्याइतके मोठे नाहीत"; संजय राऊतांकडून एकनाथ शिंदेंचा खरपूस समाचार
Dhule News : आमदारांचे 50 कोटी आणि खासदारांचे प्रत्येकी 100 कोटी हा निधी त्यांना दिल्लीतून नक्कीच मिळाला असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
Sanjay Raut धुळे : एकनाथ शिंदे व अजित पवार (Eknath Shinde and Ajit Pawar) हे दिल्लीत मुजरा करायला जातात. या संजय राऊत यांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्ही मुजरा करायला जात नाही तर निधी आणण्यासाठी जातो, असे उत्तर दिले होते. या उत्तराचा शिवसेना ठाकरे गटाचे संजय राऊत (Sanjay Raut) यांनी धुळ्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेतून चांगलाच समाचार घेतला.
माझ्या प्रतिउत्तराला उत्तर देण्याइतके ते मोठे नाहीत ते मुख्यमंत्री जरूर आहेत. यांना जो निधी मिळाला तो आमदार आणि खासदार विकत घेण्यासाठी मिळाला असल्याचा आरोप राऊत यांनी केला असून, आमदारांचे 50 कोटी आणि खासदारांचे प्रत्येकी 100 कोटी हा निधी त्यांना दिल्लीतून नक्कीच मिळाला आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
राहुल नार्वेकर अचानक आजारी पडले हा सुद्धा भूकंपच
जानेवारी मध्ये मोठा भूकंप होणार असल्याच बावनकुळे यांनी केलेल्या वक्तव्याबाबत संजय राऊत म्हणाले की, ते स्वतःपासून बोलत आहेत. सर्व पक्षांमध्ये, राहुल नार्वेकर अचानक आजारी पडले हा सुद्धा भूकंप आहे. 10 तारीख हा निकालाचा दिवस आहे आणि ते आजारी पडले ही भूकंपाची सुरुवात आहे.
मुंबई महानगरपालिकेची तिजोरी कोणी लुटली?
राज्याच्या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी निधी संदर्भात फार चर्चा करू नये. नाहीतर तुमचा निधी घोटाळा आम्हाला उघडा करावा लागेल. मुंबई महानगरपालिकेची 90 हजार कोटीची तिजोरी कोणी लुटली? असा देखील प्रश्न यावेळी राऊत यांनी उपस्थित केला आहे. राज्य सरकारतर्फे महाराष्ट्राची लूट सुरू असल्याचा आरोपदेखील यावेळी राऊत यांनी केला.
भाजपला डिवचलं
राज्यातील 14 महानगरपालिका निवडणुका तुम्ही पराभवाच्या भीतीने घेत नाहीत, असे म्हणत संजय राऊत यांनी तुमच्याकडे चिन्ह असलेली शिवसेना आहे तर मग निवडणुका का घेत नाहीत, असा प्रश्न भाजप समोर राऊत यांनी उपस्थित केला आहे.
आम्ही लवकरच भूमिका घेऊ
ईव्हीएम संदर्भात दिल्लीच्या बैठकीत एकमताने ठराव मंजूर करण्यात आला असून, ईव्हीएम संदर्भात पुढे नेमकी काय पावलं उचलायची त्यासंदर्भात आम्ही लवकरात भूमिका घेऊ, देशातल्या अनेक सामाजिक संस्थांनी ईव्हीएम विरोधात आंदोलन सुरू केलं. लोकांमध्ये जागरूकता निर्माण झालेली आहे.
मतदान प्रक्रिया निर्दोष नाही
सॅम पित्रोदा ज्यांनी या देशामध्ये दूरसंचार क्रांती केली त्या सॅम पित्रोदाने सुद्धा स्पष्ट केलेले आहे की, ईव्हीएम निर्दोष नाही. ईव्हीएममध्ये घोटाळा होऊ शकतो, अशी त्यांची खात्री झालेली आहे. विशेषतः मध्यप्रदेशचे निकाल ज्या पद्धतीने लावण्यात आले, लागले म्हणत नाही मी. निवडणुकीचा निकाल पाहता या देशांमध्ये लोकशाही पद्धतीने जी मतदान प्रक्रिया आहे ती निर्दोष नाही हे स्पष्ट झालेलं आहे.
असा होतो ईव्हीएम घोटाळा
आजच आपण सामनामध्ये याबाबत पुराव्यासहित स्पष्ट लिहिलेलं आहे की, ईव्हीएम चा घोटाळा कसा होतो आणि कसा केला जातो. मोदी, शहांचे सरकार काही एजन्सीच्या माध्यमातून ओपिनियन पोल समोर आणतात. यातून वातावरण निर्मिती करतात आणि त्यानुसार भारतीय जनता पार्टीचे दोन लोक एक आकडा जाहीर करतात. त्यानुसार ईव्हीएम सेट केले जातात. या देशातील 30 टक्के ईव्हीएम जिथे भारतीय जनता पक्ष काठावर आहे. तिथे ईव्हीएम सेट करून कशा पद्धतीने मतदान प्रक्रियेत घोळ घातला जात आहे हे मी आज पुराव्यासहित लिहिले आहे.
राज्य सरकारच्या पैशाचा प्रचारासाठी वापर
घोषणा, आश्वासन आणि प्रचार ही पंतप्रधानांची त्रिसूत्री असून त्यांनी शपथ घेतल्यापासून दहा वर्षात त्यांनी फक्त प्रचारच केला असल्याचा आरोप संजय राऊत यांनी लावला आहे, तसेच निवडणुकीच्या तीन महिने आधी पंतप्रधान आणि मंत्र्यांना प्रचारासाठी बंदी घातली पाहिजे, अशी भूमिका बाळासाहेब ठाकरे यांची होती. त्यांनी निवडणूक आयोगाला या संदर्भात मागणी देखील केलेली होती. राज्य सरकारचा पैसा ही मंडळी प्रचार करण्यासाठी वापरत असल्याने हा सर्व खर्च त्यांच्या पक्षाकडून वसूल करण्यात यावा, अशी भूमिका आमची असणार असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले आहे.
आणखी वाचा
PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी उतरणार नाशिकच्या रस्त्यावर; 12 जानेवारीला भव्य रोड शो