Dhule Accident News: विहिरीतून परी अन् खुशीचा मृतदेह काढताच कुटुंबाचा आक्रोश; चिमुरड्या मुलींसोबत घडलेल्या घटनेनं महाराष्ट्र हादरला
Dhule Accident News: गावाशेजारील प्रकाश मराठे यांच्या शेतातील चाळीत कांदा भरण्याचं काम सुरू असताना, ट्रॅक्टरवर खेळत असलेल्या तीन चिमुकल्या मुली ट्रॅक्टरसह 60 फूट खोल विहिरीत कोसळल्या.

धुळे: धुळ्यातील साक्री तालुक्यातील गणेशपूर इथे कांदे भरलेला एक ट्रॅक्टर ट्रॉलीसह विहिरीत कोसळल्याची घटना समोर आली आहे. रविवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. या ट्रॅक्टरमध्ये खेळत असलेली तीन लहान मुलं ट्रॉलीसोबत विहिरीत कोसळली (Dhule Accident news). त्यापैकी एका बाळाला वाचवण्यात यश आलं असून दोन लहान मुलींचा शोध घेण्यासाठी रविवारी रात्री उशिरापर्यंत शोधकार्य सुरू होतं. घटनेची माहिती मिळताच साक्री पोलीस (Sakri Police) ठाण्याचे पीआय दीपक वळवी व त्यांचे पथक घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. गावकऱ्यांच्या मदतीने पोलीस प्रशासनाकडून बेपत्ता दोन चिमुरड्यांना बाहेर काढण्यात आलं. (Dhule Marathi news)
Dhule Accident News: दोन चिमुकल्यांचा बुडून मृत्यू झाला
मिळालेल्या माहितीनुसार, गावाशेजारील प्रकाश मराठे यांच्या शेतातील चाळीत कांदा भरण्याचं काम सुरू असताना, ट्रॅक्टरवर खेळत असलेल्या तीन चिमुकल्या मुली ट्रॅक्टरसह 60 फूट खोल विहिरीत कोसळल्या. या दुर्घटनेत खुशी दाजू ठाकरे (वय वर्षे 3) आणि परी संदीप गायकवाड (वय वर्षे 3) या दोन चिमुकल्यांचा बुडून मृत्यू झाला, तर ऋतिका संदीप गायकवाड या तिसऱ्या चिमुकलीला ग्रामस्थांनी अथक प्रयत्नांनी वाचवलं. ही घटना दुपारच्या सुमारास घडली होती, घटनेच्या रात्री उशिरा खुशीचा मृतदेह सापडला, तर 24 तासांनंतर परीचा मृतदेह विहिरीत तरंगताना आढळून आला. रविवारी घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण गावावरती शोककळा पसरली. या चिमुरड्यांच्या मृत्यूनंतर हळहळ व्यक्त होत आहे.
Dhule Accident News: ट्रॅक्टर ट्रॉलीवर तीन चिमुकल्या खेळत होत्या
साक्री तालुक्यात माजी पोलीस पाटील प्रकाश मराठे यांच्या शेतात ट्रॅक्टरमध्ये कांदा भरण्याचं काम सुरू होतं. काम करणाऱ्या मजुरांची मुले ट्रॅक्टरवरती खेळत होती. यावेळी अचानक ट्रॅक्टर सुरू झाला आणि शेजारीच असलेल्या 60 फूट खोल विहिरीत कोसळला. ट्रॅक्टर ट्रॉलीवर तीन चिमुकल्या खेळत होत्या. ट्रॅक्टर विहिरीत पडल्याचा मोठा आवाज ऐकून ग्रामस्थ आणि आजुबाजूला काम करणारे सर्वजण मदतीसाठी घटनास्थळी आले.
ग्रामस्थांनी तातडीने मदतकार्य सुरू केले आणि पोलिसांनाही माहिती दिली. विहिरीत पडलेल्या खुशी ठाकरे (3) आणि परी गायकवाड (3) या दोघींचा शोध सुरू होता. या दुर्दैवी अपघातातून ऋतिका गायकवाड या 3 वर्षीय चिमुकलीला ग्रामस्थांनी सुखरूप बाहेर काढलं. क्रेनच्या साहाय्याने ट्रॅक्टरही विहिरीतून बाहेर काढण्यात आला. दरम्यान, तिसरी चिमुकली परी गायकवाड हिचा मृतदेह शोधण्यासाठी ग्रामस्थांनी पाण्याच्या मोटारी लावून विहिरीतील पाणी उपसण्याचे काम सुरू ठेवले होते. अखेर 24 तासांनंतर, काल परीचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. दोरीच्या साहाय्याने तिचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. चिमुकल्यांचे मृतदेह पाहून सर्वांचे मन हेलावून गेले.























