Dhule Crime News : चक्क उंटाची अवैध वाहतूक, शिरपूर शहर पोलिसांकडून 49 उंट ताब्यात
Dhule Crime News : गुजरातमधील कच्छ येथून विदर्भात 49 उंट आणले गेले असून, त्यांची अवैध वाहतूक करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.
Dhule Crime News : धुळे (Dhule) जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, चक्क उंटाची (Camel) अवैध वाहतूक करण्यात येत असल्याची घटना समोर आली आहे. गुजरातमधील कच्छ येथून आलेले हे उंट विदर्भात नेले जात होते. दरम्यान, गोंदियाकडे घेऊन जाणाऱ्या 49 उंटासह 2 जणांना धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शिरपूर तालुक्यातील विखरण गावाजवळील शिरपूर-शहदा रस्त्यावर पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली. एवढ्या मोठ्या प्रमाणावर उंट जप्त करण्याची ही जिल्ह्यातील पहिलीच कारवाई आहे. तर पोलिसांनी भोजाभाई कान्हभाई रबारी (वय 22 वर्ष, रा. कुकळसर भद्रेश्वर, गुजरात), बाराभाई मंगुभाई रबारी (वय 60 वर्ष, रा. कच्छ गुजरात) या दोन जणांना ताब्यात घेतले.
अधिक माहितीनुसार, खरण शिवारातून मोठ्या प्रमाणावर उंट जात असल्याची माहिती शिरपूर शहर पोलिसांना काही गोरक्षकांनी फोनद्वारे दिली होती. त्यामुळे, पोलिसांनी या भागात शोध मोहीम सुरु करत काही उंटासह दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली. दरम्यान, सदर उंट कचभुज येथून आणण्यात आले असून, ते ग्रामीण भागातून गोंदियाकडे घेऊन जात असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी सुमारे 9 लाख 80 हजाराचे 49 उंट जप्त केले आहेत. तसेच, पायी चालत नेण्यात येणारे उंट कोठे व कोणाला विकले जाणार होते याचा उलगडा आता पोलिस तपासात होणार आहे. तर, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अन्साराम आगरकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.
पोलिसांकडून कारवाई...
दरम्यान, याबाबत माहिती देतांना उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे म्हणाले की, आमच्या पोलीस पथकाला एक माहिती मिळाली होती. ज्यात, गुजरातमधील कच्छ येथून विदर्भात 49 उंट आणले गेले असून, त्यांची अवैध वाहतूक करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले होते. माहिती मिळताच आमच्या पोलीस पथकाने खात्री केली असता, दोन व्यक्ती 49 उंट घेऊन पायी प्रवास करत असल्याचे समोर आले. त्यामुळे त्यांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेण्यात आले. यावेळी काही उंटाची वैद्यकीय तपासणी केली असता, ते आजारी असल्याचे समोर आले. त्यामुळे उंट आजारी असतांना देखील त्यांना एवढ्या लांब चालवून त्यांच्यावर एकप्रकारे अत्याचार करण्यात येत असल्याचे समोर आले. तसेच, हे उंट कोणत्या उद्देशाने घेऊन जात आहे याचा देखील तपास होणे गरजेचे आहे. तर, या प्रकरणी प्राण्यांवर होणाऱ्या अत्याचार कायद्याप्रमाणे कारवाई केली जाणार असल्याचे पोलिस अधिकारी सचिन हिरे म्हणाले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
गुजरातहून आलेला लाखोंचा गुटखा जप्त; धुळे स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई