Ahirani Sahitya Sammelan : अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलनाचे उद्घाटन, साहित्यिकांसाठी दोन दिवस पर्वणी
Ahirani Sahitya Sammelan : सहाव्या अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे (Uttam Kamble) यांच्या हस्ते झाले. खानदेश साहित्य संघ धुळे यांच्या मार्फत हे संमेलन भरवण्यात आले आहे.
Ahirani Sahitya Sammelan : खानदेश साहित्य संघ धुळे आयोजित सहाव्या अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे (Uttam Kamble) यांच्या हस्ते झाले. यावेळी या साहित्य संमेलनाचे आकर्षण इटली येथील हेडलवर्क युनिव्हर्सिटी मधील खानदेशी साहित्य संस्कृतीच्या अभ्यासात अलीचे डिफ्लोरिया या ठरल्या. त्या गेल्या काही वर्षांपासून बोली भाषेचा आणि खानदेशी साहित्य संस्कृतीचा अभ्यास करत आहेत.
अहिराणी बोली भाषेचा जागर व्हावा तसेच भाषेचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी गेल्या सहा वर्षांपासून खानदेश साहित्य संघाच्या वतीने अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलन आयोजित केलं जात आहे. यंदा या साहित्य संमेलनाचा मान धुळे शहराला मिळाला आहे. धुळे शहरातील हिरे भवन येथे दोन दिवस चालणाऱ्या या साहित्य संमेलनाचे उद्घाटन आज जेष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांच्या हस्ते झाले.
सहाव्या अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलनस्थळाला कै. चुडामण पाटील साहित्यनगरी हे नाव देण्यात आले असून आज शहरातील गांधी पुतळ्यापासून भव्य ग्रंथ दिंडी काढत साहित्य संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. माजी मंत्री रोहिदास पाटील, धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांच्या उपस्थितीत ग्रंथ दिंडी काढून या साहित्य संमेलनाला सुरुवात झाली.
या ग्रंथदिंडीत खानदेशातील संस्कृती परंपरांचे सजीव देखावे साकारण्यात आले होते. यात कानबाई तगतराव मिरवणूक विवाह संस्कृतीचे सजीव देखावे साकारण्यात आले होते. या ग्रंथ दिंडीत शाळकरी आणि महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शहराच्या विविध भागातून निघालेल्या या ग्रंथ दिंडीने नागरिकांचं लक्ष वेधून घेतलं.
"भाषा कोणतीही असो ती भाषा एक मानवाचा युग असते. कोणतीही भाषा मरते त्यावेळी फक्त अक्षर मरत नाहीत तर मानवाचं एक युग संपत असतं. आज देशात हजारो भाषा जन्माला येत आहेत. तसेच हजारो भाषा मरत आहेत. भाषेला वाचवण्यासाठी आपण फक्त चर्चा करता कामा नये तर अनुकरण करण्याची गरज निर्माण झाली आहे. साहित्याची निर्मिती ही कोणत्यातरी एका विशिष्ट कारणासाठी झाली पाहिजे. विनाकारण निर्माण झालेलं साहित्य हे समाज परिवर्तन करत नाही, तसेच समाजातील प्रत्येक घटनेवर साहित्यिकांनी बोललं पाहिजे लिहिले पाहिजे, असे मत यावेळी उत्तम कांबळे यांनी यावेळी व्यक्त केले.
अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलनाचा उद्या समारोप होणार असून कथाकथन, कविता वाचन यासह विविध साहित्य विषयक कार्यक्रम संपन्न होणार आहेत. अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलनाच्या समारोपाला नाशिक येथील ज्येष्ठ साहित्यिक डॉ. उषा सावंत यांची विशेष उपस्थिती असणार आहे.
महत्वाच्या बातम्या
पाहा फोटो : अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलन उत्साहात, खानदेशी संस्कृतीचा अभ्यास करणारी इटलीची खास पाहुणी आकर्षणाचा केंद्र