तुळजाभवानी विकास आराखड्यातील दर्शन मंडप वाद; उद्या तुळजापूर बंदची हाक
Tuljapur News: नवरात्रोत्सवाची तयारी अंतीम टप्प्यात असताना विकास आराखडा आणि त्यातील काही मुद्यांवर आक्षेप घेतला जात आहे. याच मुद्द्यांवरून काही पुजारी आक्रमक झाले आहेत. अशातच उद्या तुळजापूर बंदची हाक देण्यात आली आहे.
Tuljapur Bandh Tomorrow: अवघ्या काही दिवसांवर नवरात्रोत्सव (Navratri 2023) येऊन ठेपला असतानाच उद्या अवघ्या महाराष्ट्राचं (Maharashtra News) श्रद्धास्थान असलेल्या तुळजापुरात (Tuljapur News) बंदची हाक देण्यात आली आहे. तुळजाभवानी मंदीर विकास प्रारूप आराखड्यातील (Tuljabhavani Temple Development Format Plan) दर्शन मंडपाच्या जागेवरून वाद सुरु झाला आहे. दर्शन मंडप हा घाटशीळ येथे करण्यास काही पुजारी, काही व्यापारी, काही स्थानिक नागरिकांचा विरोध आहे. त्यामुळेच त्यांनी तुळजापूर शहर बंदचं (Tuljapur Bandh Tomorrow) आवाहन केलं आहे.
तुळजाभवानी मातेचा शारदीय नवरात्र उत्सव सुरू आहे. देवीची मंचकी निद्रा सुरू आहे. 15 ऑक्टोबरला घटस्थापना होणार आहे. नवरात्रोत्सवाची तयारी अंतीम टप्प्यात असताना विकास आराखडा आणि त्यातील काही मुद्यांवर आक्षेप घेतला जात आहे. याच मुद्द्यांवरून काही पुजारी आक्रमक झाले आहेत. दर्शन मंडप हा तुळजाभवानी देवीच्या मुख्य महाद्वार येथे असावा, अशी पुजारी आणि व्यापाऱ्यांची मागणी आहे. तसेच, दर्शन मंडपाची जागा बदलल्यास काही व्यापाऱ्यांचं आणि, काही स्थानिक नागरिकांचं नुकसान होणार आहे, त्यामुळे दर्शन मंडपाची जागा बदलण्यास व्यापारी, नागरिकांनी विरोध दर्शवला असून त्याविरोधात उद्या तुळजापूर बंदची हाक दिली आहे.
तुळजाभवानी मंदीर संस्थानाचे विश्वस्त असलेले भाजप आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून मंदिर परिसराचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. अराखड्याचे बुधवारी सायंकाळी 5 वाजता तुळजाभवानी मंदीर संस्थान प्रशासकीय कार्यालयासमोर सादरीकरण होणार आहे. 15 ऑक्टोबरपर्यंत यावर सूचना भाविक, पुजारी, व्यापारी आणि स्थानिक नागरिक यांना करता येणार आहे. 16 ते 17 ऑक्टोबर हे दोन दिवस समक्ष सूचनांवर चर्चा होणार आहे. तर, 20 ऑक्टोबरपर्यंत नागरिक आणि भाविकांनी केलेल्या सुचनांवर तांत्रिक आणि प्रशासकीय विभागाकडून अभिप्राय घेतला जाईल. त्यानंतर 26 ऑक्टोबरपर्यंत जिल्हाधिकारी यांना याबाबतचा अंतिम अहवाल सादर करण्यात येणार आहे.
विकास आराखड्यानुसार काय बदल होणार?
- नव्या आराखड्यात वातानुकुलित सभागृहातून दर्शनाची रांग असणार आहे.
- एकूण 10 वातानुकुलित सभागृह आहेत.
- या सभागृहांची एक लाख भाविक क्षमता
- एका सभागृहातून दुसऱ्या सभागृहात पाठवून भाविकांना टप्प्याटप्प्याने मंदिरात सोडले जाईल
- दर्शनाला किती वेळ लागेल हे आधीच कळणार आहे.
- वाहन पार्किंगच्या ठिकाणीच काऊंटर पास मिळेल.
- भाविकांना मंदिर परिसरात तासभर आधी प्रवेश मिळेल.
- मंदिर परिसरातील बांधकामात बदल होणार आहेत.
दरम्यान, तीर्थक्षेत्र तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिरासाठी प्रसाद योजनेतून एक हजार कोटींचा नवा आराखडा तयार होत आहे. तीर्थक्षेत्र तुळजापूर येथील तुळजाभवानी मातेचे दर्शन अधिक सुलभ करण्यासाठी तसेच भाविकांच्या वेळेची बचत व्हावी यासाठी नवीन बदल करण्यात येणार आहेत. शिर्डी, तिरूपती देवस्थानच्या धर्तीवर बदल करण्यात येणार आहे. दर्शनासाठी आपला नंबर कधी येणार हे भक्तांना आधीच कळेल. त्यासाठी वाहन पार्किंग परिसरातच काऊंटर पास देण्यात येणार आहे. त्यावरील वेळेनुसार तासभर आधी मंदिर आवारात भाविकांना प्रवेश मिळणार आहे. दर्शन लाईन प्रकल्पातून टप्प्याटप्याने भाविकांना थेट मंदिरात सोडले जाणार आहे