मराठा आरक्षण! मराठवाड्यातील आत्महत्या सत्र सुरूच; धाराशिव जिल्ह्यात एकाने गळफास घेऊन संपवलं जीवन
Suicide for Maratha Reservation : धाराशिव जिल्ह्यात एकाने मराठा समाजाला सरकार आरक्षण देत नसल्याने नैराश्यातून गळफास घेऊन आत्महत्या केली.
धाराशिव : मराठवाड्यात गुरुवारी एकाच दिवशी तिघांनी मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आत्महत्या (Suicide) केल्याची घटना ताजी असतानाच, आता धाराशिव जिल्ह्यात देखील आणखी एकाने आरक्षणाच्या मागणीसाठी स्वतःच जीवन संपवला आहे. परंडा तालुक्यातील डोमगाव येथील 47 वर्षीय शेतकऱ्याने मराठा समाजाला सरकार आरक्षण देत नसल्याने नैराश्यातून गळफास घेऊन आत्महत्या केली. स्वतःच्या शेतात लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन या शेतकऱ्याने आपली जीवनयात्रा संपवली. ही घटना शुक्रवारी (27 ऑक्टोबर) रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास घडली आहे. बळीराम देविदास साबळे (वय 47 वर्ष) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे.
मराठा आरक्षणासाठी राज्यभरात आंदोलन सुरू आहे. दरम्यान, मराठा आरक्षणासाठी अनेकांनी टोकाचे पाऊल उचलत आपले जीवन संपवले आहे. धाराशिव जिल्ह्यात देखील गुरुवारी एकाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. धाराशिव जिल्ह्यात आरक्षणाच्या मागणीसाठी हा तिसरा बळी गेल्याने संताप व्यक्त होत आहे. डोमगाव येथील शेतकरी बळीराम देविदास साबळे असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी साबळे घरातून शेतात जात असताना, 'आपल्याला काही आरक्षण मिळत नाही, मेल्यालं बरं', असे गावात बसल्यानंतर कांही ग्रामस्थांजवळ नैराश्येच्या भावनेतून बोलत होते. त्यानंतर दुपारी शेतात गेल्यावर एक वाजेच्या सुमारास त्यांनी लिंबाच्या झाडाला गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली.
मराठा आरक्षणाचा निर्णय होत नसल्याने होते निराश...
बळीराम हे जेवण करण्यास घरी का येईनात म्हणून त्यांची पत्नी मिराबाई या शेतात गेल्या असता त्यांनी सर्वप्रथम ही घटना पाहिली आणि आरडा ओरड केली. ही माहिती समजताच कांही ग्रामस्थ शेतकरी घटनास्थळी पोहचले. त्यांचे चुलत भाऊ गणेश साबळे यांनी याबाबत परंडा पोलीस ठाणे व परंडा तहसीलदार यांना माहिती दिली आहे. बळीराम साबळे यांना दोन मुले आहेत. एक मुलगा ज्ञानेश्वर हा उच्च शिक्षण घेत आहे तर दुसरा मुलगा सिद्धेश्वर हा अपंग आहे. वडील अर्धांगवायु आजारामुळे घरातच आहेत. त्यांना केवळ दीड एकर शेती असून यातूनच त्यांचा उदरनिर्वाह सुरू होता. आरक्षणाच्या मागणीसाठी ते आग्रही होते. परंतु, याबाबत कोणताही निर्णय होत नसल्याने ते निराश असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले आहे.
आत्महत्या सत्र सुरूच...
मागील काही दिवसांत मराठवाड्यात मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. मराठवाड्यात गुरुवारी जालना येथील अंतरवाली टेंभी गावातील शिवाजी किसन माने (वय 45 वर्षे), छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील आपतगाव येथील गणेश काकासाहेब कुबेर (वय 28 वर्षे) आणि हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील देवजना लहू उर्फ कृष्णा यशवंतराव कल्याणकर (वय 25 वर्षे) यांनी आपलं जीवन संपवलं आहे. त्यानंतर आता धाराशिव जिल्ह्यातील बळीराम देविदास साबळे यांनी देखील आपलं जीवन संपवलं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या...