Dharashiv Maratha Protest : राजभरातून जरांगेच्या आंदोलनाला पाठिंबा! धाराशिवमध्ये 109 गावांत राजकीय पुढाऱ्यांना बंदी, लातूरमध्येही गावबंदी
Dharashiv Support Manoj Jarange Patil : धाराशिव जिल्ह्यातल्या 109 गावांमध्ये राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी आहे, अशा आशयाचे फलक गावच्या चौकाचौकात लागलेले आहेत.
Dharashiv Village Ban Political Leaders : मनोज जरांगे पाटील यांचा सराटी इथं सुरू होत असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन दिवसापासूनच मराठा समाजाने राजकीय पुढाऱ्यांना आपापल्या गावांमध्ये गावबंदी केली आहे. धाराशिव जिल्ह्यातल्या 109 गावांमध्ये राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी आहे, अशा आशयाचे फलक गावाच्या चौका चौकात लागलेले आहेत. लातूर जिल्हा नांदेड जिल्हा जालना जिल्हा छत्रपती संभाजीनगर जिल्हा हिंगोली जिल्हा परभणी जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये असे फलक दिसून येत आहेत.
राजभरातून जरांगेच्या आंदोलनाला पाठिंबा
महत्त्वाचं म्हणजे लातूर जिल्ह्यात राजकीय पुढाऱ्यांना गावबंदीच्या दोन घटना घडल्या आहेत. कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे यांना त्यांच्याच मतदारसंघातल्या एका गावामध्ये गावात प्रवेश करायला गावकऱ्यांनी बंदी केली. संजय बनसोडे यांना गावाच्या प्रवेशद्वारापासून परत फिरावं लागलं लातूर शहरचे आमदार अमित देशमुख आणि लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख यांच्याही विरोधामध्ये मराठा समाजाच्या तरुणांनी घोषणाबाजी केली. तुम्ही विधानसभेमध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल काहीही बोलला नाहीत असं म्हणत दोन्हीही देशमुख बंधूच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.
राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी
नांदेड जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये निषेधाचे काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न झाला. त्यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करून या तरुणांकडे झेंडे काढून घेतले. जरांगे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरत हे गाव बंदीचे सत्र आणखी किती काळ आणि किती तीव्रतेने सुरू राहील याकडे सरकार राजकीय पक्षाचे नेते सगळ्यांचे लक्ष असेल.
नांदेडमध्येही आरक्षणासाठी आंदोलन
नांदेडमध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलाय. आज नायगांव तालुक्यातील पळसपूर - टाकळगांव या गट ग्रामपंचायतीच्या शेकडो गावकऱ्यांनी एकत्रित येत सामूहिक शपथ घेतली आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही तोवर गावात कुठल्याच राजकीय नेत्यांनी येऊ नये, अशी बॅनर बाजी गावकऱ्यांनी केली आहे. गावकऱ्यांनी सरकारच्या विरोधात जोरदारपणे नारेबाजी करत आरक्षणाची मागणी लावून धरलीय. एकूणच नांदेडमध्ये आता गावोगावी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला वाढता पाठिंवा मिळत असून अनेक गाव आंदोलनात सहभागी होताना दिसत आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न चिघळण्याची भीती व्यक्त केली जात आहे.